‘सामना’तील गलिच्छ भाषेवरून चंद्रकांत पाटलांचा संताप,थेट रश्मी ठाकरेंना लिहिणार पत्र

मुंबई नगरी टीम

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातील लिखाण अगदी रोखठोक असते. अग्रलेखातील याच भाषेवरून आता भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.सामनामध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. या प्रकरणी ते थेट आता सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांनाच पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीविषयी लिहताना अग्रलेखात वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे

सामनाचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत हे अग्रलेख लिहितात.सामाजिक, राजकीय विषयांवर भाष्य करताना संजय राऊत अग्रलेखात रोखठोक लिखाण करताना दिसतात. मात्र याच लिखाणात वापरलेली भाषा गलिच्छ असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींनाच एक पत्र लिहणार आहे. तुम्ही संपादिका आहात, त्यामुळे अग्रलेख तुमच्या नावाने लागतो.आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर अग्रलेखात जी भाषा वापरली ते रश्मी वहिनी संपादक असलेले संपादकीय असूच शकणार नाही”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध दर्शवला असून चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा किंवा निवडणुकीचाही नाही, तर तो भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचे नाव तरी कशाला? हे आधी हटवा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते, तेव्हा बाळासाहेबांनी ही मागणी केली होती. बाळासाहेबांनी केलेली मागणी धरून राहा असे सांगतानाच, त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वादात आपल्याला पडायचे नाही, असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवणार असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.शिवाय मुंबईसह इतर पालिका जिंकणे हेच लक्ष्य राहील, असाही निर्धार त्यांनी केला. तसेच मुंबईवर दिल्लीचे लक्ष राहील, असेही ते म्हणाले. मुंबई महानगरपालिका ही काही जणांची जहागीर झाली. मुंबईच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि पैसा जनरेट करणे एवढेच काही जणांचे लक्ष्य राहिले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

‘सामना, हा ठाकरेंचा ब्रँड, त्यात काही गलिच्छ लिखाण नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’मधूम आपल्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण करण्यात आल्याची तक्रार केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. या इशाऱ्यानंतर शिवसेनेने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामनातून अशी गलिच्छ टीका केली जात नाही. सामना हा ठाकरे परिवाराचा ब्रँड आहे. त्याला साजेशी अशी भाषाच त्यात लिहिली जाते,असे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सामनातील भाषेवरून केलेल्या तक्रारीवर भाष्य करताना अनिल परब म्हणाले की, “सामनातून कुठलीही गलिच्छ टीका होते, असे मला वाटत नाही. सामनाची एक विशिष्ट शैली आहे. तो ठाकरे परिवाराचा ब्रँड आहे. त्यामुळे त्या ब्रँडला साजेशी अशी भाषाच सामनामध्ये लिहली जाते. कुठलीही गलिच्छ भाषा वैगरे त्यात लिहिली जात नाही”, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली. शिवसेना खासदर संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटिशीविषयी सामनात अग्रलेख लिहण्यात आला होता. त्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Previous articleशिवसेनेला निवडणुका जवळ आल्यावरच औरंगाबाद नामांतराचा मुद्दा आठवतो
Next articleदेवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना दिली नवी “ऑफर”