मुंबई नगरी टीम
पुणे : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटे झालेल्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला होता.कोरोनाच्या संकटानंतर उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस आज पुन्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आल्याने हे दोन नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आजच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी अजितदादांना वेगळीच ऑफर दिली.दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा,किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या, अशी विनंती फडणवीस यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झाले.या कार्यक्रमापुर्वी माध्यमात आलेल्या बातम्यावरून फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोपरखळ्या लगावल्या.फडणवीस म्हणाले,अजित पवारांसोबत एकाच मंचावर कार्यक्रम असला की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस बातम्या चालतात हे नवीनच आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादा आमदार कामानिमित्त मंत्र्यांना भेटायला गेला की लगेच तो पक्ष सोडतोय अशा बातम्या येतात. पण याची कधीच पर्वा करायचे कारण नाही. जनतेसाठी जिथे जावे लागेल तिथे जायचे, जे काम करायचे आहे असे फडणवीस यांनी सांगत,दादा,दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा,किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या अशी ऑफरच फडणवीस यांनी दादांना दिली. आता या नव्या ऑफरवरून राजकीय वर्तुळात चर्चेला सुरूवात झाली आहे.
दरम्यान या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आमने सामने येऊन घोषणाबाजी केल्याने काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. सात वर्षानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. मात्र कामाच्या श्रेयवादावरुन भाजप युवा मोर्चा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले.अजित पवार यांनी फडणवीसांच्या भाषणाचा धागा पकडला.मी पण दोन चार दिवस पाहिले त्याच त्याच बातम्या दाखवल्या जात आहेत. बातम्या दाखवलाय काही नसले की ते हे दाखवणारच असेही अजित पवार म्हणाले.