मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याच्या राजकारणात औरंगाबादच्या नामांतराचा विषय चांगलाच तापलेला आहे. नामांतरावर शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतलेली असताना महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाने मात्र याला विरोध दर्शवला आहे.नामांतराच्या या वादात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने देखील उडी घेतली आहे.औरंगाबादचे नाव बदललात तर आंदोलन करू, असा इशारा थेट आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यामुळे नामांतराचा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
“औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विरोध आहे.औरंबादचे नाव हे औरंगाबादच राहिले पाहिजे.त्याचे नामांतर करता कामा नये,अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आग्रही भूमिका आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न जर या सरकारने केला, तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षांपासून औरंबादचे हे नाव आहे ते बदलता कामा नये, अशी आरपीआयची भूमिका आहे”, असे रामदास आठवले यांनी म्हटले. औरंगाबादचे नामांतर व्हावे, अशी भाजपची देखील भूमिका आहे. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नामांतराची मागणी केली होती. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप नेते शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाविकास आघाडीसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसने मात्र नामांतराला ठाम विरोध केला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे, अशी भूमिका स्पष्ट केली होती. त्यावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाने बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. मात्र नामांतराला काँग्रेसचा विरोधच राहील, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले. औरंबादचे नामांतर हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक पाहता हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.