शिवसेनेचा मोर्चा शेतकऱ्यांसाठी,मराठा आरक्षणासाठी का निघाला नाही ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे.केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या ५ जानेवारीला वर्षा राऊत या ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरण्याची चर्चा आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले आहे. “शिवसेना ईडी ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे.. हा मोर्चा मराठा आरक्षणसाठी निघाला नाही.. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही.. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही.. पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म ?”, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर राहणार असून यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. मुंबईसह जवळच्या शहरांतून शिवसैनिक येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

वर्षा राऊत यांनी पीएमसी बँकेच्या खात्यातून संजय राऊत यांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकारणी ईडीने ही नोटीस बजावली आहे. २९ डिसेंबर २०२० ला वर्षा राऊत यांना हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. मात्र ईडीकडून अधिकच वेळ मगितल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. त्यानुसार ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. या आधीही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला होता. त्यामुळे वर्षा राऊत यांना आलेल्या नोटिशीनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान,वर्षा राऊत यांच्यावरील आरोप संजय राऊत यांनी फेटाळले आहेत.

Previous articleऔरंगाबाद नामांतराबाबत रामदास आठवलेंनी मिसळला काँग्रेसच्या सुरात-सूर !
Next article३ कोटींच्या आलिशान ऑफिसबाबत उर्मिला मातोंडकर म्हणतात…!