मुंबई नगरी टीम
मुंबई : औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून ती सर्व पक्षांना माहिती आहे. मात्र जे नामांतराला विरोध करतात, त्या पक्षांना भाजप का प्रश्न विचारत नाही, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. औरंगाबादचे नामांतर ३० वर्षांपूर्वीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. त्यावर केवळ सरकारी शिक्का उमटायचा बाकी आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते सोमवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे नामांतराच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या काळातच हे नामांतर व्हायला हवे होते. त्यांना जर इतकीच काळजी आहे. तर शिवसेनेला प्रश्न विचारण्यापेक्षा जे संभाजीनगरच्या नावाला विरोध करत आहेत, त्यांना प्रश्न का विचारत नाहीत, असा उलट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. भाजपला यावर राजकारण करण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
संभाजीनगरप्रमाणेच औरंगाबाद विमानतळाच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. हा प्रस्ताव अद्याप का रखडला आहे, यावर भाजपने दिल्लीत जाऊन याचा राज्याच्या जनतेसमोर खुलासा करावा, असेही संजय राऊत यांनी म्हटले. औरंगाबादच्या नामांतराला समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विरोध केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अबू आझमी संभाजीनगरला विरोध करतील असे मला वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता. ते समजूतदार नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असे राऊत म्हणाले.