नाणार घोटाळ्यात ठाकरेंच्या नातेवाईकाचा हात असल्याने जमीन परत करण्याचे नाटक

मुंबई नगरी टीम

मुंबई : नाणारमधील शेतकऱ्यांनी विकलेल्या जमिनी त्यांना परत देणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे नाणारवासियांना मोठा दिलासा मिळणार असून हा प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. परंतु जमीन घोटाळ्यातील धागेदोरे सापडल्यानेच शिवसेना पळवाट काढत असल्याची टीका भाजप नेते निलेश राणेंनी केली आहे. जमीन परत करण्याचे केवळ नाटक सुरू आहे,असा आरोपही त्यांनी केला आहे.

“नाणारच्या जमीन घोटाळ्यात उध्दव ठाकरेंचा मावस भाऊ व सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हात असल्याने तसेच नाना पटोले यांनी चौकशीचे आदेश दिल्याने,जमीन घोटाळ्या संदर्भात धागेदोरे सापडल्याने पळवाट काढायचं काम शिवसेना करीत आहे. म्हणून शेतकऱ्यांना जमीन परत करण्याचे नवीन नाटक सुरू केले”, असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे. नाणार प्रकल्पासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्याची चर्चा असतानाच विनायक राऊत यांनी जमिनीसंदर्भात मोठी घोषणा केली. परंतु हे सगळे नाटक असल्याचे म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होणार नाही, असे विनायक राऊत यांनी म्हटले. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी ७ लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाल्यास जमिनीचे मूल्य हे ९० लाख रुपये होणार आहे. गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द केले जातील, अशी ग्वाही विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान, शिवसेनेने आधीपासूनच नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. असे असतानाच शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्पाला समर्थन केले होते. त्यामुळे नाणारबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.

Previous article३ कोटींच्या आलिशान ऑफिसबाबत उर्मिला मातोंडकर म्हणतात…!
Next articleनामांतराला विरोध करणा-या पक्षांना भाजप प्रश्न का विचारत नाही ? – संजय राऊत