ज्यांची जनतेने दखल घेतली नाही,तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी ? सामंतांचा राणेंवर प्रहार

मुंबई नगरी टीम

मुंबई । माझी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली,हे कुणी सांगितले,ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे,ज्या मंडळींना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारले, ज्यांची जनतेने दखल घेतलेली नाही,तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी ? अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना टोला लगावला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट करत केल्याने एकच खळबळ उडाली होती.सामंत आणि फडणवीस यांच्यात कुठे आणि कशासाठी बैठक झाली अशी चर्चा राणे यांच्या ट्विटनंतर आज दिवसभर होती.त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांचा खरपूस समाचार घेतला.माझी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली,हे कुणी सांगितले आहे,ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचे असून,ज्या मंडळींना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारले,मी त्यांच्या आरोपांवर कधीही मी बोलत नाही,कारण ज्यांची जनतेनेच दखल घेतली नाही,तर माझ्यासारख्या मंत्र्याने का घ्यावी ? असा टोला मंत्री सामंत यांनी राणे यांना लगावला आहे.

मला गुप्त बैठक करायचीच होती,तर माझ्या मतदारसंघात कशाला करू ? रत्नागिरीच्या शासकिय विश्रामगृहावर दोनशे लोकांच्या समोर कशाला करू ? गुप्त बैठक करायची असेल,तर मुंबई, नागपूर,चेन्नई हैदराबाद अशा शहरात जाऊन गुप्त बैठक करेल ना असा सवाल करतानाच,अशा प्रकारचे ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा माझ्यावरचा विश्वास उडेल,अशा भ्रमात जर कुणी असेल,तर हा त्यांचा बालिशपणाच आहे.त्यामुळे त्यांच्यावर बोलणे मी टाळतो.याचा अर्थ मी त्यांना घाबरतो असा होत नाही, पण कुणाबद्दल बोलावे,अशा शब्दात सामंत यांनी राणे यांच्यावर प्रहार केला.पहाटे “शपथविधी झाला आणि सकाळी गौप्यस्फोट झाला,तर मी त्याला गौप्यस्फोट समजू शकतो”,पण ही घटना सहा दिवसांपूर्वी घडली.मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर पोहोचलो. त्यावेळी तिथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले. महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे,जी आम्हाला शिकवली गेली. त्याप्रमाणे मी फडणवीस यांचे स्वागत केले. त्यात काही पाप केले नाही,असेही सामंत यावेळी म्हणाले.

मी एकटा कुणाला भेटलो नाही.ज्यांनी हे आरोप केलेत ते खूप मागे उभे होते.त्याठिकाणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आ.रवींद्र चव्हाण,आ.प्रसाद लाड उपस्थित होते आणि त्यानंतर निलेश राणे त्या ठिकाणी आले. त्यामुळे कदाचित बघण्यात फरक होऊ शकतो. मात्र विरोधी पक्षनेते फडणवीस माझ्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांना भेटलो असेल तर मी गुन्हा केलाय असे मला वाटत नाही असे सांगून,अशा पद्धतीने राजकीय संस्कृती बिघडवणाऱ्यांना जर आपण सोबत ठेवणार असाल,तर भविष्यातील महाराष्ट्राचे राजकारण काय असू शकते याची प्रचित सगळ्यांना आली असेल,असा मित्रत्वाचा सल्ला सामंत यांनी फडणवीस आणि दरेकरांना दिला आहे.

Previous articleमुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “मी केवळ निमित्तमात्र,माझी टीम मजबूत व कुशल”
Next articleतोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई