नारायण राणेवर टीका करताच खासदार विनायक राऊतांना राणेंची उघड धमकी !

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग । शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. त्यातही कोकणात राणे आणि शिवसैनिक आमने-सामने येणार नाहीत,असे होणे अश्यकच.शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप खासदार नारायण राणेंना डिवचले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली,तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैव असेल, अशी खोचक टिप्पणी विनायक राऊत यांनी केली.

खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार,अशी चर्चा सध्या सुरू आहे. यासंदर्भात बोलताना विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर चांगलेच तोंडसुख घेतले. एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचे दुर्दैवच असेल,अशी टीका राऊत यांनी केली. तर बुडत्याला काडीचा आधार, असा टोलाही त्यांनी लगावला.दरम्यान, विनायक राऊत यांनी राणे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आदींवर देखील निशाणा साधला होता.विनायक राऊत यांच्या या टीकेला आता भाजप नेते निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

विनायक राऊत जिथे दिसणार तिथे फटके चढवणार – निलेश राणे

निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. “विनायक राऊत स्वतःची किंमत काय हे विसरले आहेत. भाजपच्या लाटेमध्ये विनायक राऊत दोनदा निवडून आले. हिंमत असेल तर विनायक राऊत यांनी राजीनामा द्यावा, पुन्हा निवडणूक लढवावी आणि किती मते येतात ते पाहावे. पण तेवढीही हिम्मत विनायक राऊत करणार नाहीत”, अशी टीका निलेश राणेंनी केली. पुढे ते म्हणाले की, विनायक राऊत हे स्वतः नॉन मॅट्रिक आहेत. त्यांची घाणेरडी लफडी आहेत. खासदारकीचा एकही गुण त्यांच्यात नाही. त्यांच्या कुठल्याही बोलण्याला अर्थ नाही. विषयावर न बोलता केवळ टीका करणे. मातोश्रीचे चप्पल चोर अशी त्यांची ओळख आहे. विनायक राऊत तुमची वेळ जवळ आली आहे. २०२४ ला तुमचा बंदोबस्त करणार आणि कायमचे कोकणातून हकलवणार. भाषा बदलली नाही, तर जिथे दिसणार तिथे फटके चढवणार”, अशी उघड धमकीही निलेश राणेंनी दिली आहे.

Previous article५ लाखा पेक्षा जास्त व्यक्तींना लस ; तिसऱ्या टप्प्यासाठी १ मार्चपासून नोंदणीची शक्यता
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरून छगन भुजबळांचा भाजपवर निशाणा