हिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई मनपा आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या : उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान

मुंबई नगरी टीम

मुंबई । गोरेगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट,भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा खरपूस समाचार घेतला.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की यांना मुंबई आठवते असे सांगून मुंबई ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे पण आमच्यासाठी ही मातृभूमी आहे,आमची आई आहे.या आईवर चाल करून येणा-यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही,असे ठणकावतानाच हिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई महानगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या,असे खुले आव्हान त्यांनी अमित शहांना दिले.

शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आज पहिल्यांदाच गोरेगाव मध्ये झालेल्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांचा आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला.गटप्रमुखांचा मेळाव्याला एवढी गर्दी तर दसऱ्याला किती गर्दी असणार आहे असे सांगून,दसरा मेळावा हा शिवर्तीर्थावरच होणार असे त्यांनी ठणकावले.व्यासपीठावर सध्या कारागृहात असलेले खासदार संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची आरक्षित होती.राऊत हे शिंदे गटात गेले असे बोलतील पण राऊत हे मोडेल पण वाकणार नाहीत या विचाराचे आहेत.सध्या मिंधे तिकडे गेलेत असे सांगून,माझे वडील जागेवर आहेत का असा सवाल त्यांनी केला. मुलं पळवणारी टोळी पाहिली पण सध्या बाप पळवणारी औलाद पहिल्यांदाच राज्यात पाहिली अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.मुंबईवर लचके तोडणारी गिधाड,त्यांची औलाद फिरायला लागली आहे.शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा,हे शहा,ते शहा असे अनेक चाल करून आले.आताही त्या कुळातील मुंबईत येऊन गेले.त्यावेळी अमित शाह म्हणाले,शिवसेनेला जमीन दाखवा.तुम्हीं प्रयत्न कराच, मुंबईच्या जमीनीत गवत नाही तर तलवारीची पाती आहेत असे सांगून, तुम्हांला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही असे प्रत्युत्तर शहा यांना दिले.हिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई महानगरपालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या असे आव्हानही त्यांनी अमित शहांना दिले.मुंबईवर संकटात असते तेव्हा हे कुठे असता ? जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे येतात. ही तुमच्यासाठी रिअल इस्टेटमधील पर स्क्वेअर फीटप्रमाणे विकायची जमीन आहे, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे, आमची आई आहे. या आईवर चाल करून येणा-यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात त्यांनी केला.

बंडखोरांची दसरा मेळाव्यात लक्तरे काढणार असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय ? असा सवाल त्यांनी करून वंशवादावर कुंटूंबावर टीका पण मला याचा अभिमान आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. २५ वर्षे युतीत सडली,कुजली असे सांगून तुमचा वंश कोणता असा सवाल त्यांनी केला.पंतप्रधान मोदी यांनी भारतात आणलेल्या चित्त्यावरून ही त्यांनी टीकास्त्र सोडले.चित्ता कधी डरकाळी फोडत नाही.आम्ही पेंग्विन आणले पण नाटकं केले नाही असे सांगून वरळीत आर्थिक केंद्र झालेच पाहिजे असेही ठणकावले.वेदांता प्रकल्पावरूनही त्यांनी राज्य सरकार आणि केंद्रावर निशाणा साधाल. मुंबई हे देशाच आर्थिक केंद्र आणि आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता ? वेदांतावरून धादांत खोट बोलता? कुणाशी भांडताय? आम्हीं येऊ तुमच्यासोबत, आणतो म्हणा, परत आणा. मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी टीका वेदांता प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली.

Previous articleआज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ११ महत्वाचे निर्णय
Next articleवेदांता फॅाक्सकॅान गुजरातला गेल्याने शिवसेनेचे सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश आंदोलन’