वेदांता फॅाक्सकॅान गुजरातला गेल्याने शिवसेनेचे सरकारच्या विरोधात ‘जनआक्रोश आंदोलन’

मुंबई नगरी टीम

मुंबई । बंडखोरी केल्याने शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सामना रंगला असतानाच लाखो रोजगार देणारा वेदांता फॅाक्सकॅान महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.या विरोधात आता शिवसेनेच्यावतीने युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवा पिढीचे झालेल्या नुकसानीच्या निषेधार्थ शनिवारी तळेगावमध्ये सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प तळेगावात होण्याचे जवळपास निश्चित झाले होते.मात्र राज्यात सत्ताबदल होताच राज्यातील शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला पाठवला गेला.लाखो रोजगार देणार हा प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.राष्ट्रवादीकडून राज्यातील विविध भागात राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. आता शिवसेनेने राज्य सरकारच्या विरोधात या प्रश्नावरून दंड थोपटले आहेत.हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील युवा पिढीच्या झालेल्या नुकसानीच्या निषेधार्थ शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी २४ सप्टेंबर रोजी तळेगाव पुणे येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यात सत्ताबदल होताच राज्यातील शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला पाठवला गेला.यामुळे राज्यातील १ लाख तरूण बेरोजगार झाले तर १.५४ लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्राने गमावली आहे.आता बेरोजगार तरूण-तरूणींनी करायचे काय ? तरूणाईच्या हक्काचे रोजगार हे सरकार कसा उपलब्ध करून देणार हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.याचा जाब विचारण्यासाठी आणि हा प्रकल्प परराज्यात गेल्याच्या निषेधार्थ हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांनी दिली आहे.

Previous articleहिंमत असेल तर महिन्याभरात मुंबई मनपा आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या : उद्धव ठाकरेंचे अमित शहांना आव्हान
Next articleदसरा मेळाव्याला उत्साहात वाजत गाजत आणि गुलाल उधळत या ! उद्धव ठाकरेंचे आवाहन