पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरून छगन भुजबळांचा भाजपवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात आंदोलनजीवी असा शब्द वापरत विरोधकांवर निशाणा साधला होता.मोदींच्या या शब्दोच्चारावर विरोधकांसह अनेकांनी टीका टिप्पणी केली आहे. यावरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपला सुनावले आहे.आंदोलनजीवी कोण हे ठरवायचे झाले, तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना हिणवणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पार पडलेल्या जनता दरबारानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“आंदोलने ही देशभर नव्हे तर जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचे. कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बसणे इत्यादी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलने त्यांनी केली. तर सभागृहातसुद्धा आंदोलने केली”, याची आठवण छगन भुजबळ यांनी करून दिली. “लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल, तर पत्र पाठवायचे, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरे काय करायचे?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“आंदोलनजीवी अशा पध्दतीने शेतकऱ्यांना हिणवणे योग्य नाही. आजही प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर भाजप आंदोलन करत आहे. त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचे झाले, तर काटा हा भाजपकडेच वळतो”, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी सेलिब्रिटींच्या ट्विट्सच्या चौकशीविषयी देखील भाष्य केले. चौकशी करणार म्हणजे त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली जाणार असे नाही. तर त्याबद्दल केवळ माहिती घेतली जाईल. आम्हीही भारतरत्नांचा सन्मान करतो, असे छगन भुजबळ म्हणाले.

Previous articleनारायण राणेवर टीका करताच खासदार विनायक राऊतांना राणेंची उघड धमकी !
Next articleसंजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवयच :चंद्रकांत पाटलांचा टोला