जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू ! उद्धव ठाकरेंनी अमित शहांना ठणकावले

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यावर विश्वासघात केला असल्याने आता उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे,असे वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू,त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या.अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई भेटीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपचे खासदार,आमदार,नगरसेवक आणि पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.निवडणुकीत मोदी आणि फडणवीस यांच्या नावाने मतं मागितली.मात्र जिंकून आल्यावर विश्वासघात केला असल्याने आता उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे,असा घणाघात शहा यांनी केला होता.शहा यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मातोश्रीवर झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांना प्रत्त्युत्तर दिले.मुख्यमंत्रीपद ही माझी खासगी मालमत्ता नाही.मला मुख्यमंत्रीपदाला चिटकून राहिचे असते तर आमदारांना डांबून ठेवले असते.माझी ममता बॅनर्जीकडे ओळख होती. त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो.कालीमातेच्या मंदिरात नेले असते,त्यांना राजस्थानात नेता आले असत पण तो माझा स्वभाव नाही.त्यामुळे जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू,त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या.अशा शब्दात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सुनावले.

थोडक्यात सध्या संघर्षाचा काळ आहे.शिवसेना संपवायला निघाले आहे.निष्ठा ही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही.नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे आहे अशा शब्दात त्यांनी फुटीर आमदारांनाचा समाचार घेतला.यावेळेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच घ्यायचा आहे.दसरा मेळाव्यात मी सविस्तर आतापर्यंत बोलणार आहे.यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे आता तसे नाही असे सांगून दसरा मेळाव्यात बंडखोरांचा खरपूस समाचार घेणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

Previous articleशिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील यासाठी दक्षता घ्या : मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Next articleमुख्यमंत्री राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! अनेक चर्चांना उधाण