मुख्यमंत्री राज्यपाल भेटीनंतर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! अनेक चर्चांना उधाण

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केलेली १२ जणांची यादी रद्द केल्याची चर्चा असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे जावून राज्यापलांची भेट घेवून चर्चा केली.या भेटीनंतर लगेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने या भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त १२ जणांची नियुक्ती करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने देण्यात आलेली १२ जणांच्या नावांची यादी रद्द करण्याची मागणी करण्यात येवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने १२ जणांची यादी राज्यपालांना सादर करणार असल्याची चर्चा गेली दोन दिवस सुरू असतानाच आज मंत्रालयातील कामकाज आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर लगेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात नक्की काय शिजत आहे अशी कुजबूज सुरू आहे. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या ‘जल भूषण’ या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली.राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाचे आज विसर्जन होते.त्यामुळे आरतीनंतर उभयतांनी गणरायाला निरोप दिला व बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत काही वेळ भाग घेतला.त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे चालली असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जावून गणपतीचे दर्शन घेतले होते.ही कोणतीही राजकीय भेट नव्हती तर केवळ वर्षा निवासस्थानी बसवलेल्या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे गेले असल्याचे सांगण्यात येते.या भेटी वेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे,मुलगा अमित ठाकरे यांच्यासह मनसे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई हेही उपस्थित होते.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात यावेळी जवळपास ४० मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

Previous articleजमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू ! उद्धव ठाकरेंनी अमित शहांना ठणकावले
Next article११६६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १३ ऑक्टोबरला मतदान ; थेट सरपंचपदांची निवड होणार