५ लाखा पेक्षा जास्त व्यक्तींना लस ; तिसऱ्या टप्प्यासाठी १ मार्चपासून नोंदणीची शक्यता

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत कोविन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. ५ लाख ४७ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली असून त्यापैकी ४१ हजार ४९३ जणांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा ५० वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे १ मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल असेही टोपे यांनी सांगितले. राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरु असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Previous articleविधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि काँग्रेसकडेच राहिल : नाना पटोले
Next articleनारायण राणेवर टीका करताच खासदार विनायक राऊतांना राणेंची उघड धमकी !