जातीय तेढ निर्माण करणा-या व्यक्ती, संघटनांवर कठोर कारवाई करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त एकत्रित धोरण ठरविणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सोमवारी येथे दिली. राज्यात कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ३ मे नंतर मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने भोंग्यासाठी धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती वळसे पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत येत्या दोन दिवसात एकत्रित धोरण तयार करण्यात येईल. त्यानुसार अधिसूचना जारी करून संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे वळसे- पाटील यांनी संगितले . राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांची बैठक

दरम्यान, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता बैठक होत आहे. या बैठकीत भोंग्यांसाठी नियमावली तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे. ही बैठक पोलीस महासंचालक कार्यालयात होणार आहे.

Previous articleकोण अयोध्येत गेला काय किंवा राममंदिरात गेला काय, महागाईचे चटके कमी होणार आहेत का ?
Next articleआजारपणातून बाहेर पडताच मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू