नवीन प्रदेशाध्यक्षाबाबत अशोक चव्हाणांनी केला मोठा खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसच्या गोटात खलबते सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि एच. के. पाटील यांच्यातही बैठक झाली. मात्र या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष देण्याच्या हालचालींना वेग आला असून एच. के. पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. तसेच आज बुधावरी अशोक चव्हाण आणि एच.के. पाटील यांची भेट झाली. मात्र यावेळी नवीन प्रदेशाध्यक्षाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.हा विषय माझ्याकडे चर्चेला आलेला नाही. राज्यातील विविध राजकीय परिस्थितींविषयी निश्चित चर्चा झाली आहे. शिवाय तीन पक्षांच्या समन्वयासंदर्भात काय करता येईल, याविषयी चर्चा झाली, असे अशोक चव्हाण म्हणाले.
एका व्यक्तीला एकच जबाबदारी द्यावी या प्रश्नावर आपले मत मांडताना चव्हाण म्हणाले, यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. राज्यात एका व्यक्तीकडे एक पद असावे किंवा नसावे हा शेवटी हायकमांडचा विषय आहे. त्यावर राज्यस्तरावर निर्णय होऊ शकत नाही. बाळासाहेब थोरात हे माझे वरिष्ठ सहकारी आहेत. ते चांगले काम करत आहेत. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना तयारीला लागली असून अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजराती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी बोलताना प्रत्येक पक्षाची आपली एक रणनीती असते. यावर मी काही टिप्पणी करणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Previous articleसर्वसामान्यांना घरांसाठी होणार लाभ ; ३१ डिसेंबर पर्यंतची गुंठेवारी नियमित होणार
Next articleसत्ता गेल्याने भाजपला धक्का बसला आहे ;नीलम गोऱ्हेंचे सडेतोड उत्तर