सत्ता गेल्याने भाजपला धक्का बसला आहे ;नीलम गोऱ्हेंचे सडेतोड उत्तर

मुंबई नगरी टीम

पुणे : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण केले जात आहे. नामांतराचा विषय म्हणजे शिवसेनेचे नाटक असून ही सगळी नाटक कंपनी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.फडणवीसांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सरकारवर टीका करणे हेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे काम आहे. सत्ता गेल्याने त्यांना धक्का बसला आहे, असा टोला त्यांनी लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकांमुळे शहराच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नामांतराला काँग्रेसने विरोध केल्यानंतर भाजप आता शिवसेनेला कोंडीत पकडत आहे. केवळ निवडणुकीपुरता शिवसेनेला नामांतराचा मुद्दा आठवतो, अशी टीका भाजप नेते करत आहेत. या टीकेला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरकारवर टीका करणे हेच विरोधी पक्षातील नेत्यांचे काम आहे. त्यांनी जर टीका केली नाही तर ते नाटक कंपनीतीलच एक पात्र आहेत, अशी शंका वाटेल. प्रेक्षक म्हणून ते चांगली भूमिक निभावत आहेत. त्यामुळे आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची गरज नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी खडसावले. मी परत येईन ऐवजी आत परत जायची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना हाणला.

संभाजीनगरचा प्रस्ताव हा आधीच ठेवलेला आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर हा वादाचा विषय नाही. महाविकास आघाडी संभाजीनगरच्या स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन योग्य वेळी निर्णय घेईल. मात्र काही लोक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, नामांतराचा विषय हा दिवसेंदिवस अधिक चिघळत चालला आहे. यावर शिवसेना सविस्तर भूमिका मांडणार आहे. तर शिवसेना नामांतराच्या विषयावर राजकारण करत असून औरंगाबाद महापालिकेची सत्ता आम्हाला द्या, एका दिवसात नामांतर करू असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

Previous articleनवीन प्रदेशाध्यक्षाबाबत अशोक चव्हाणांनी केला मोठा खुलासा
Next articleवर्षा राऊत यांना ईडीचे पुन्हा समन्स, ‘या’ दिवशी होणार चौकशी