मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात येण्याची चर्चा असतानाच भाजपच्या महिला आघाडीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत, असे म्हणत भाजपच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र यावरूनच आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांनाच खोचक टोला लगावला.
भाजपच्या महिला आघाडीच्या मागणीनंतर सचिन सावंत यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे.”हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजप महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपमधीलच काही नेते टेन्शनमध्ये आले असतील”, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. भाजप महिला आघाडीने थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला आहे. परंतु महिला आघाडीच्या या मागणीनंतर सचिन सावंत यांनीच भाजपवर पलटवार केला आहे.
रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. या सर्व तक्रारी आणि आरोप खोटे आहेत. केवळ माझी बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे आरोप केले जात असल्याचा खुलासा मुंडेंनी केला. तसेच रेणू शर्मा यांची बहिण करुणा हिच्याशी असलेल्या संबंधाविषयी देखीले धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणामुळे त्यांची आमदारकीही धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे .