मुंबई नगरी टीम
मुंबई : एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच मुंडे यांनी या प्रकरणी माध्यमासमोर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांची भेट घेवून,मी माझे म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे.आता पक्ष म्हणून जो काही निर्णय होईल.तो मला मान्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरुणीने बलात्काराचे आरोप केल्यानंतर विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.आज राष्ट्रवादीनेही आपली भूमिका जाहीर केली आहे.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.या प्रकरणी स्वत: धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे.आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही असे सांगतानाच,मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बलात्कराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी याबाबत समाज माध्यमातून आपली बाजू मांडली आहे.आरोपानंतर धनंजय मुंडे हे आपल्या शासकिय निवासस्थानी होते.त्यांनी या प्रकरणी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबारासाठी हजेरी लावण्यासाठी आलेले धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडली.
माझ्या राजीनाम्याबाबत पक्ष निर्णय घेईल,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.पक्षाध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी सर्व माहिती दिलेली आहे.राजीनाम्याबद्दल पक्ष काय तो निर्णय घेईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात न्यायालय आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील.पण पक्ष मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल,असे शरद पवार यांनी सांगितले.