मुंबई नगरी टीम
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांशी यावर चर्चा केली जाईल.तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याचे कारण नाही.पक्षप्रमुख म्हणून जो काही निर्णय असेल तो घेऊ,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कराच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.विरोधी पक्षाकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून या प्रकरणी स्पष्टीकरण दिले होते.मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पक्षप्रमुख म्हणून शरद पवार काय भूमिका घेणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.त्यानंतर आज शरद पवार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. शरद पवार यांनी या भेटीबाबत माध्यमांना सांगितले.”धनंजय मुंडे काल स्वतः मला भेटले. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची सविस्तर माहिती त्यांनी मला दिली.त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ट संबंध होते.त्या संबंधांतून काही तक्रारी झाल्या.पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंबंधी चौकशीची प्रक्रिया सुरू झाली असेल. या प्रकरणी वैयक्तिक हल्ले होतील, हे जाणून त्यांनी आधीच उच्च न्यायालयात जाऊन भूमिका मांडली.त्याबाबत न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे,असे शरद पवार म्हणाले.
“धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरूप गंभीर आहेत. आम्हाला पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल.यासाठी पक्षाचे जे प्रमुख सहकारी आहेत त्यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही. या सगळ्यांना विश्वासात घेऊन याविषयी सविस्तरपणे निर्णय घेवू असे सांगून,धनंजय मुंडे यांनी माझ्यासमोर सखोल माहिती सादर केली आहे.त्यामुळे त्यांची माहिती सहकाऱ्यांना सांगणे माझे कर्तव्य आहे.सहकाऱ्यांची मते लक्षात घेऊन पुढची पाऊले टाकणार.यावर लवकरात लवकर चर्चा करू.पक्ष आणि पक्षप्रमुख जी काही काळजी आहे ती घ्यावी लागेल. त्याबद्दल तातडीने निर्णय घेऊ,असे पवारांनी स्पष्ट केले. यावेळी पवारांनी धनंजय मुंडे यांचा अद्याप राजीनामा घेतलेला नाही, असेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याचे कारण नाही
दरम्यान,धनंजय मुंडे यांच्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का? काही निर्णय ते घेणार का? असा सवाल शरद पवारांना करण्यात आला. यावर बोलताना पवारांनी सांगितले की, आधी मला माझाच निर्णय घेऊ द्या, मुख्यमंत्री वैगरे नंतर बघू. पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय होईल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. पक्षप्रमुख निर्णय निर्णय घेऊ, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.माध्यमांशी बोलताना पवार यांनी मंत्री नवाब मलिक यांची ठामपणे पाठराखण केली.नवाब मलिक हे राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्यावर कोणतेही वैयक्तिक स्वरुपाचे आरोप करण्यात आलेले नाही. त्यांच्या नातेवाईकावर आरोप झाले आहेत.त्या नातेवाईकाला संबंधित यंत्रणेने अटक केली आहे, असे पवार म्हणाले.