तक्रारदार महिला पुन्हा पोलीस ठाण्यात,धनंजय मुंडेंचाही जबाब नोंदवणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बलात्काराचा आरोप करणारी महिला रेणू शर्मा ही आज पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे या प्रकरणी आता महिलेसह धनंजय मुंडे यांचा देखील जबाब पोलीस नोंदवणार,अशी माहिती मिळत आहे.धनंजय मुंडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना पोलिसांसमोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.

रेणू शर्मा हिने आज डी.एन.नगर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी तिने आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना दिली असल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेने आधी तक्रार दाखल केली होती. मात्र याप्रकरणी कोणताही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. त्यामुळे लवकरच धनंजय मुंडे यांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले जाऊ शकते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासह महाविकास आघाडीसाठीसमोर एक मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान. बॉलिवूडमध्ये आपल्याला संधी देण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून धनंजय मुंडे यांनी आपल्यावर सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्माने केला आहे. या प्रकरणी तिने धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात १० जानेवारीला तक्रार केली. त्यानुसार ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. महिलेने केलेल्या आरोपांनुसार तिच्यावर २००६ पासून अत्याचार होत असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र या प्रकरणी आपल्याला ब्लॅकमेल केले जात असल्याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

धनंजय मुंडे पहाटेपासून शासकीय निवासस्थानी

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या समोर फारसे आलेले नाहीत. प्रसार माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी धनंजय मुंडे हे गुरुवारी पहाटेच अडीच-तीनच्या सुमारास आपल्या खासगी गाडीतून मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट या शासकीय निवास्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच या निवासस्थानी होते. त्यानंतर अनेक कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी चित्रकूट येथे दाखल झाले होते.

Previous articleधनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही ! नेत्यांनी वक्त केल्या प्रतिक्रिया
Next articleनैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा