मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या संकटात राज्यातील बेरोजगारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात सुमारे १७ हचार पदांची भरती करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार ५० टक्के म्हणजेच ८५०० जागांसाठी उद्या जाहिरात निघणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.या मध्ये नर्सेस,टेक्निशियन,वॉर्डबॉय असा वेगवेगळ्या पदासह, क आणि ड वर्गाच्या पदांची ही भरती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.राज्याच्या आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भरतीची जाहिरात उद्या ( सोमवारी) निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ग्रामविकास विभागातील आरोग्याशी संबंधित १० हजार आणि आरोग्य विभागातील ७ हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे.यापैकी सध्या ५० टक्के म्हणजे ८ हजार ५०० पदांसाठी जाहिरात उद्या निघणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.या भरतीत जीएनएम,नर्सेस, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशी वेगवेगळी पद असतील.क आणि ड वर्गाच्या पदांची ही असणार आहे.या पदांसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा होईल आणि त्यानंतर दोन तीन दिवसात निकाल लागेल, अशी माहितीही टोपे यांनी दिली.