मुंबई नगरी टीम
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हायरल झालेल्या कथित व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाची दखल केंद्र सरकराने घ्यावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा असून केंद्राने याची दखल घ्यावी,असे अनिल देशमुख म्हणाले. अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले असून त्यात टीआरपी घोटाळ्यासह बालाकोट हल्ल्यासंदर्भात संभाषण करण्यात आले आहे. तसेच याचा संबंध पंतप्रधान कार्यालय ते भाजपशी देखील आहे.त्यामुळे आता राज्यातील काँग्रेसने अर्णबसह भाजपला फैलावर घेतले आहे.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली. हा देशद्रोहाचा प्रकार आहे असून गोस्वामीना तात्काळ अटक करावी,अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
अर्णब गोस्वामीला ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टच्या अंतर्गत अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.यासंदर्भात गृहमंत्री कायदेशीर मत जाणून घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करतील,असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे सांगितले.यावेळी अनिल देशमुख यांनी देखील हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे.अर्णब गोस्वामी आणि पार्थो दास गुप्ता यांचे ५०० पानांचे चॅट मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले आहेत. बालाकोटचा हल्ला २६ फेब्रुवारीला झाला मात्र २३ फेब्रुवारीलाच रिपब्लिक टीव्हीकडे यासंदर्भात माहिती होती. ही सर्व गंभीर बाब असून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा यातून उपस्थित होतो. त्यामुळे केंद्र सरकराने दखल घेणे गरजेचे आहे, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसै न देता त्यांच्या फ्रिक्वन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या टीव्हीने सरकारी मालकीच्या दूरदर्शनच्या फ्रिक्वन्सी वापरून टीआरपी वाढवण्याचा खटाटोप केलेला आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला मोठा पाठिंबा आहे. परंतु हा जनतेचा पैसा लुबाडला असल्याने ईओडब्ल्यू कडून याची चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी केली.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही सावंत यांनी दिली.अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील हे कथित चॅट शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. या चॅटमध्ये अर्णब गोस्वामी यांनी चॅनलचा टीआरपी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर या चॅटमध्ये संवेदनशील अशा बलाकोट हल्लाविषयी देखील चर्चा करण्यात आली आहे. हल्ला होण्याच्या काही दिवसांपूर्वीच अर्णब यांच्याकडे याविषयी माहिती होती, असे समोर आले आहे. अर्णब यांनी आपली पंतप्रधान कार्यालय, माहिती जनसंपर्क मंत्रालय आणि एएस यांच्याशी जवळीक असल्याचे देखील चॅटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे इतकी संवेदनशील माहिती अर्णबकडे कशी आली असा सवाल सर्वच स्तरातून उपस्थित केला जात आहे.
रोहित पवारांचे टीकास्त्र
कथित व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.”लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का ? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावे”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. एरवी अर्णबला अटक झाल्यानंतर गळा काढणारे राज्यातील भाजपचे नेते सध्या चिडीचूप आहेत. त्यामुळे यावर आता भाजप नेत्यांनी भूमिका मांडावी अशी मागणी सत्ताधारी करत आहेत.