मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सीमावादाच्या प्रश्नावर थोडा अभ्यास करावा. हा प्रश्न केवळ कर्नाटकचा नसून, दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे, हे उपमुख्यमंत्र्यांना कळले पाहिजे, असे टोला संजय राऊतांनी लगावला. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत, हे कर्नाटकच्या सरकारने विसरू नये, असा सूचक इशारा देखील राऊतांनी दिला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आज संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असे लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “असे वेडे बरळतच असतात, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते होते. हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही. तर दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे.हे उपमुख्यमंत्र्यांना कळले पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे”,अशी टीका संजय राऊतांनी केली.
“मुंबई,महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात,आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इथे कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथे अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगावसारख्या भागमध्ये ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा, आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असे कधी कुणाला म्हणत नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावे आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथे ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे काम करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांचे जर मतदान घेतले इथे, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातच आले पाहिजे.” असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, कायद्याने काय व्हायचे ते होईलच, पण आता महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे सुद्धा कर्नाटच्या सरकारने विसरू नये, असा थेट इशाराच संजय राऊत यांनी दिला. तसेच कालची बैठक ही निर्णायक होती. त्यामुळे तिकडे कुणी काही बरळले तरी इकडे आम्हाला काही फरक पडत नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी फटकारले.