तुमच्या सरकारला जे जमले नाही ते काम आम्ही नक्कीच करू

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला वाद काही नवीन नाही. मेट्रोच्या याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला डिवचले. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधील प्रवास करतानाच फोटो ट्वीट केला होता. यामध्ये त्यांनी मुंबई मेट्रोतून असा प्रवास कधी करता येईल असा प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला होता. त्यामुळे फडणवीसांच्या या प्रश्नाचे उत्तर आता काँग्रेसकडून देण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला रिट्वीट करत त्यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. यावेळी सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्यासहा मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “काँग्रेसच्या काळात विकसित झालेल्या दिल्ली मेट्रोचे तुम्ही कौतूक केले त्याचा आनंद आहे. मुंबईमध्ये जी एकमेव मेट्रो पूर्ण झाली आहे ती देखील आघाडी सरकारच्या काळात झाली आहे. तुमच्या सरकारला तर २०१९ ची डेडलाईनही पाळता आली नाही. महाविकास आघाडीला प्रशासकीय कामांचा अनुभव असून जे काम तुमच्या सरकारला जमले नाही ते काम आम्ही नक्कीच करू. केवळ मोदी सरकराने त्यांनी निर्माण केलेले अडथळे दूर करावेत”, अशी अपेक्षा सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे.

यासह सचिन सावंत यांनी आणखी एक ट्वीट करत मेट्रो कारशेडवरून फडणवीस सरकारने घातलेल्या गोंधळाविषयी देखील भाष्य केले. “कांजूरमार्ग येथील जमीन कायम उपलब्ध होती. मात्र तुमच्या सरकारने गोंधळ घालून जमिनीचा करार शापुरजी पालोनजी बिल्डरसोबत केला. तुमच्या सरकारने सार्वजनिक मेट्रोपेक्षा खासगी बिल्डर्सना प्राध्यान दिले. या गोंधळासाठी तुम्ही जर एखाद्याला दोष देऊ पाहत असाल, तर आधी तुम्ही आरशात पाहा”, असा टोलाही सचिन सावंत यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होता. यावेळी त्यांनी दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. या प्रवासातील फोटो त्यांनी ट्वीट करत दिल्ली मेट्रोचे कौतुक केले. “मी आज दिल्ली विमानतळावर परतण्यासाठी मेट्रोने प्रवास केला. रस्त्याने प्रवास करण्याच्या तुलनेत अगदी कमी वेळात मी पोहोचलो. मात्र महाविकास आघाडीने कारशेडच्या मुद्द्यावरून घातलेला गोंधळ पाहता मी मुंबईतील मेट्रो३ मधून विमानतळापर्यंत कधी प्रवास करू शकेन माहित नाही”, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला.

Previous articleमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत हे विसरू नका !
Next articleमुंबई लोकल सर्वांसाठी सुरु केली तर… वडेट्टीवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती