मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु केली तर… वडेट्टीवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

मुंबई नगरी टीम

मुंबई : येत्या १ फेब्रुवीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार अशी सध्या चर्चा आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भातील शक्यता वर्तवली होती. त्यामुळे लोकलबाबत मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. मात्र असे असले तरी मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर ठेवून लोकल सर्वांसाठी सुरू करण्याची मोठी जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे लोकल सुरू करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच लोकल सुरू केली तर गर्दी उसळेल त्यामुळे संक्रमण वाढण्याचीही भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र लोकल सुरू करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांची देखील हीच भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादावेळी त्यांनी यासंदर्भात भाष्य केले. हळूहळू सर्व गोष्टींना सरकार परवानगी देत आहे. केवळ आता लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भातील मुद्दा राहिलेला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे. लोकलमध्ये जो गर्दीचा लोंढा येतो त्याच्यावर नियंत्रण कसे करायचे. मग लोकांकडून नियमांचे पालन होत नाही. कोरोना सध्या पूर्णतः आटोक्यात आहे. अशा परिस्थितीत पुन्हा मुंबईची अवस्था बिघडू नये, यासाठी मुख्यमंत्री फार दक्ष आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

लोकल सुरू करताना सरकारकडून कोणती दक्षता घेतली जाईल याबाबतचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आला आहे. मात्र न्यायालयाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही सूचना किंवा मार्गदर्शन आलेले नाही. मुंबई लोकल सर्वांसाठी धावली पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. परंतु कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. अशा परिस्थितीत कोणतेही पाऊल टाकताना विचारपूर्वकच टाकावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. याविषयी पुन्हा एकदा बैठक होणार असून त्यामध्ये काही तोडगा निघू शकतो, असे ते म्हणाले. तसेच लोकलमधून लाखो मुंबईकर प्रवास करतात. अशावेळी नियम पाळले नाहीत आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर जबाबदारी कोणाची? आरोपी म्हणून सरकारला पिंजऱ्यात उभे केले जाईल असे सांगतानाच दोन्ही बाजूने बोलणारी मंडळी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला वडेट्टीवार यांनी विरोधकांना लगावला.

Previous articleतुमच्या सरकारला जे जमले नाही ते काम आम्ही नक्कीच करू
Next articleतुम्हाला महिला सन्मानाचा इतका कळवळा असता तर… चंद्रकांत पाटलांची गृहमंत्र्यांवर टीका