मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही आले नाही. केवळ नागपूर आणि नाशिकच्या मेट्रोसाठी निधी देण्यात आला आहे. यावरून आता राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी आमने-सामने आल्याचे दिसत आहे. भाजपची सत्ता असल्याने नागपूर आणि नाशिक मेट्रोला निधी दिला हे पटणारे नाही. कारण यापुढे नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला निराशा आल्याचे संजय राऊत म्हणाले.
कोरोनानंतर सादर झालेल्या या अर्थसंकल्पाकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र सामान्यांना यातून फारसा दिलासा मिळालेला नाही. महाराष्ट्रासाठी कोणतीही आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निवडक राज्यांनाच दिलासा देण्यात आल्याची टीका राज्यातील विरोधक करत आहेत. संजय राऊत यांनी अर्थसंकल्पाविषयी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा हा महाराष्ट्रातून विशेष करून मुंबईतून मिळणाऱ्या महसूलावर टिकून असतो. पण सर्वाधिक निराशा ही महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचे देणे लागते. त्या संदर्भात काही आहे काय? जीएसटी असेल किंवा इतर काही परतावे आहेत. दोन शहरांना तुम्ही मेट्रोचा गुळ लावलेला आहे. पण जी मेट्रो केंद्र सरकारने मुंबईत अडकवून ठेवली आहे. त्या विषयी कुणी बोलायचं? असे अनेक विषय आहेत. तुमच्या खिशात काही आहे का? तुमच्या खिशात काही नाही. मराठीत एक म्हण आहे, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे दिल्लीचे बाजीराव हे देशाला वाटत चालले आहेत, पण आहे का आपल्याकडे? बघा जरा”, असे संजय राऊत यांनी केंद्राला सुनावले.”महाराष्ट्र एक मोठे राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत आलेला आहे. अन्याय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र देशाचे पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कुणी पाहत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आकडे किती खरे किती खोटे सहा महिन्यांत कळेल
“अर्थमंत्री जे आकडे मांडत आहेत, त्या आकड्यात आम्हाला फार पडायचे नाही. ते आकडे वर्षानुवर्षे येतच असतात. ते किती खरे असतात, किती खोटे असतात हे सहा महिन्यांनी कळते. आता काहीजण या अर्थसंकल्पाचा अभ्यास करत असतील, त्यातून काही काढतील. पण मला असे वाटते की, थोडे अर्थसंकल्पामध्ये तो कुणाचाही असो आर्थिक थापा मारणे हे बंद केले पाहिजे. सामान्य माणसाला केवळ भूकेची व पोटाची भाषा कळते, तरूणांना रोजगाराची भाषा कळते. अशा काही सोप्या भाषेत जर तुम्ही अर्थसंकल्प सांगितला किंवा मांडला व त्यातून काही कृती झाली. तर त्या अर्थसंकल्पाची आम्हाला पाठ थोपटता येईल”, असे संजय राऊत म्हणाले.
नागपूर आणि नाशिकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही
नागपूर आणि नाशिकमध्ये भाजपची सत्ता आहे म्हणून मेट्रोला निधी दिला, हे मला काही पटत नाही. कारण यापूढे नागपूर आणि नाशिकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. नाशिकला तर नक्कीच नाही आणि नागपूरला तर मोठे युद्ध होईल. मुंबईची मेट्रो का रखडवून ठेवली आहे ते बोला आधी. केंद्राची जमीन आहे म्हणतात. कुठून मंगळावरून जमीन आणली की चंद्रावरून , असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला. ही आमचीच जमीन आहे. ती मेट्रो सुरू करून घ्या ना आम्हाला. तुम्ही नाशिक आणि नागपूरच्या गोष्टी आम्हाला कुठे सांगता? दोन्ही शहरे महाराष्ट्रातच आहेत उत्तर ध्रुवावर नाही, असे बोल संजय राऊतांनी केंद्राला लागवले.