केंद्राने देश विकायला काढला हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले – बाळासाहेब थोरात

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्व घटकांचे लक्ष लागले होते. अर्थसंकल्प सादर झाला असून त्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प देशासाठी होता की येणाऱ्या निवडणुकांसाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षातील अन्य नेत्यांनीही अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या एका वचनाची देखील आठवण करून दिली. केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारतवर जोर देण्यात आला आहे. पण सरकारी संस्था विकणे हे आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.’मैं देश नहीं बिकने दूंगा’ असे पंतप्रधान म्हणायचे. परंतु पंतप्रधान खोटे बोलत होते हे अर्थमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले. अर्थसंकल्पातील घोषणा या देशासाठी आहेत की येणाऱ्या निवडणुकीचा हा जाहीरनामा आहे, असा सवालही थोरात यांनी केला. बजेटमधून देशातील सामान्यांना, बेरोजगारांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला चालना देणे याविषयीचे कोणतेही काम झालेले दिसत नाही, अशी नाराजी थोरात यांनी व्यक्त केली.

केवळ निवडणूक जिंकणे हेच भाजपचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीनेच आजचा अर्थसंकल्प होता, असा आरोपही त्यांनी केला. शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा होती, मात्र तसेही झालेले नाही. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले असे विचारले असता थोरात म्हणाले, महाराष्ट्र सर्वात जास्त कर केंद्राला देत असतो. मात्र महाराष्ट्र कडे बघण्याची दृष्टी चांगली नाही. जीएसटीचा परतावा वेळेवर येत नाही. मुंबई सारख्या मोठ्या आर्थिक केंद्रासाठी देखील काहीच दिलासा दिलेला नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

भेदभाव करणारा अर्थसंकल्प – छगन भुजबळ

या अर्थसंकल्पातून आयकर भरणाऱ्यांना सवलत नाही, शेती पिकवणाऱ्याला, घाम गाळून उद्योगधंदे करणाऱ्यांना सवलत नाही, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांना दिलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नेमका कुणासाठी आहे हे कळत नाही. निवडणुका येतात जातात पण अशा प्रकारचा मोठा भेदभाव मी कधीही पाहिलेला नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

महाराष्ट्राचा बदला घेण्याचे काम – विजय वडेट्टीवार

‘खिशात नाही नोट आणि खैरातीची मोट’ असा हा अर्थसंकल्प आहे, अशी खोचक टिप्पणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. वित्तीय तूट साडे नऊ टक्क्यांपर्यंत मोजली आणि जीडीपी उणे सातवर गेला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे दिसते. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तानपेक्षा या देशाची वाईट स्थिती आहे. शेतकऱ्यांना मजबूत करणारी कुठलीही व्यवस्था या अर्थसंकल्पात नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसून बदला घेण्याचे काम केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर निवडणुका असलेल्या राज्यांना भरीव मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र भारतात नाही का? असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

Previous articleदोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात…फडणवीस-राऊत गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
Next articleयापुढे नागपूर आणि नाशिकमध्ये भाजपची सत्ता राहणार नाही – संजय राऊत