दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात…फडणवीस-राऊत गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा रविवारी मोठ्या थाटामाटात पार पडला. अनेक राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय विचारधारा वेगळी असली तरी दोन मित्र भेटल्यावर मिठी मारतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीवरून प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, “आपल्या देशाची संस्कृतीच अशी आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवे होते”, असे मत त्यांनी व्यक्त केले. राजकीय विचार वेगळे असले तरी स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यावर आपण प्रेमाने मिठी मारतो, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही उल्लेख केला. “राजकारणात दुश्मनी कधीच नसावी मैत्री असायलाच हवी. जरी आम्ही पवार साहेबांवर टीका टिपण्णी केली, तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचे असेल, तर त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पण, पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच, ही आमची संस्कृती आहे”, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांची कन्या उर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांचा साखरपुडा रविवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला. काही मोजके नातेवाईक सोबतच राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहकुटुंब उपस्थित होते. महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रितच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देत पूर्वशी आणि मल्हार यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संजय राऊत यांनी स्टेजवर जाऊन फडणवीस यांची गळाभेट घेतली. एरवी एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या नेत्यांनी एकमेकांची घेतलेली ही गळाभेट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Previous articleसत्य समोर मांडणे महत्त्वाचे,शरद पवारांकडून कृषीमंत्री तोमर यांचा समाचार
Next articleकेंद्राने देश विकायला काढला हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले – बाळासाहेब थोरात