मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम असून आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा असून शिवसेनेने देखील आता रस्त्यावर उतरून त्याचे समर्थन केले आहे. शिवसेना खासदर संजय राऊत यांनी आज गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे शिष्टमंडळ देखील यावेळी उपस्थित होते. अहकारांतून राजकणार आणि देश चालत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला.
संजय राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रतापराव जाधव, राजन विचारे आणि कृपाल तुमाणे आदी उपस्थित होते. आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी शेतकरी नेते राकेश टीकैत यांची भेट घेतली. राऊत आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने टीकैत यांच्याशी चर्चा केली. तसेच आंदोलकांशी देखील संवाद साधला. यावेळी काही महिला आंदोलकांनी पुढे येऊन संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. शिष्टमंडळाने सर्व आंदोलकांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.
अहंकाराने देश चालत नाही
आंदोलकांची भेट घेतल्यानंतर निघालेल्या संजय राऊत यांनी थोडक्यात माध्यमांशी संवाद साधला. हा केवळ पंजाब, हरियाणा किंवा एका राज्याचा विषय नाही. तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. त्यात राजकारण येता कामा नये, असे सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही. राजकारणही चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली. दरम्यान, संजय राऊत यांना मुंबईत आझाद मैदानात झालेल्या शेतकरी आंदोलनात शिवसेनेचा सहभाग का नव्हता? असे विचारण्यात आले. मात्र त्यावर काही न बोलताच संजय राऊत निघून गेले.