मुंबई नगरी टीम
नागपूर : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याजागी कोणाची वर्णी लागणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. अशातच विधानसभेचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे जाणार, अशी चर्चा असताना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले आहे. शिवसेनेत विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील, असे उदय सामंत म्हणाले.
नागपूर मध्ये पत्रकारांना प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी यासंदर्भात भाष्य केले. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले की, ” शिवसेनेमध्ये मंत्री कोण व्हावा, आमदार कोण व्हावा आणि विधानसभेचा अध्यक्ष कोण व्हावा हे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे ठरवतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा शब्द शिवसैनिकांसाठी अंतिम आहे”, असे उदय सामंत म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांनी गुरुवारी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे. तर विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे दिले जाणार असून उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाण्याची चर्चा देखील समोर आली होती. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे.
यावेळी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या इंधन दरवाढ विरोधातील आंदोलनावर देखील त्यांनी भाष्य केले. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने ‘अच्छे दिन आयेंगे’च्या नावाखाली पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजपने केंद्रात सत्ता आणली. मात्र आता सात-आठ वर्षांनंतर किती अच्छे दिन आले, हे सर्वांना माहित आहे. आता इंधनाची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांवर परिणाम होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर कायमस्वरूपी कमी असावेत, अशी भूमिका केंद्रासमोर मांडली होती. त्याचाच भाग म्हणून आज शिवसेना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.तसेच इंधन दरवाढीवर शिवसेना आंदोलन करत आहे. त्यामुळे आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी भाजप वीज तोडणीविरोधात आंदोलन करत आहे, असा टोलाही उदय सामंत यांनी लगावला.