अमित शहांच्या पायगुणामुळे ठाकरे सरकार जावे,राणेंनी व्यक्त केली इच्छा

मुंबई नगरी टीम

सिंधुदुर्ग । राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असे, भाकीत अनेकदा भाजप नेते नारायण राणे करताना दिसतात. अशीच एक इच्छा त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेचे ७ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले. अमित शाह यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे, अशी इच्छा यावेळी राणेंनी व्यक्त केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असू नये. मी प्रार्थना करेन की, अमित शाह महाराष्ट्रात येताच राज्यातील सरकार जावे, असे नारायण राणे म्हणाले. शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा रंगलेली असताना नारायण राणेंनी यावर भाष्य केले. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजप समर्थ आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यासह आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर असेल. गुजराती समाज मोदी आणि शाह यांना सोडून बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला फटकारले. मुंबई महत्त्वाचे शहर असून मुंबईकरांना भाजपची गरज आहे, असेही ते म्हणाले.

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीविषयी देखील नारायण राणेंनी भाष्य केले. पेट्रोल-डिझेलचे दर अमित शाह, नरेंद्र मोदी ठरवत नाहीत. त्यामुळे यासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेची धरसोड वृत्ती असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे सरकार व्यवस्थित चालवतात का?, असा सवालही त्यांनी केला. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, सत्तेसाठी सौदा केला. त्यादिवशी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

Previous articleशिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद ? उदय सामंत म्हणाले !
Next articleचीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही इतका बंदोबस्त बघितला नाही !