मुंबई नगरी टीम
नाशिक । विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १२ जणांच्या नावांची शिफारस करून दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने राज्य सरकारमध्ये अस्वस्थता असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्यपाल कोश्यारी यांना इशारा दिला आहे.
विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर दोन महिन्यापूर्वीच राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने नावांची शिफारस केली आहे.मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील असणारे संबंध पाहता राज्यपालांनी यावर अद्यापही कोणताच निर्णय घेतला नसल्याने आता या मुद्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांसंदर्भात कालच आपली भूमिका मांडून नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या मुद्द्यावरून थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.राज्यपालांनी आम्हाला न्यायालयात जायला लावू नये,’ असे राऊत यांनी आज म्हटले आहे.राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.पण राज्यपाल हे घटनाबाह्य वागत असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात येणा-या १२ आमदारांची नियुक्ती ही राजकीय नसून,राज्य सरकारने राज्यपालांना १२ नावांची शिफारस केली आहे.या यादीला मान्यता देणे राज्यपालांना बंधनकारक असतानाही राज्यपाल त्यावर कोणताच निर्णय घेत नाहीत.त्यामुळे त्यांनी आम्हाला न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये,’ असा इशारा देतानाच, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या राज्यपालांना परत बोलवावे,अशी मागणीही राऊत यांनी केली.
महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या १२ जणांच्या नावाची यादी
राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार)
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा)
यशपाल भिंगे (साहित्य)
आनंद शिंदे (कला)
काँग्रेस
रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार)
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा)
अनिरुद्ध वनकर (कला)
शिवसेना
उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील
विजय करंजकर
चंद्रकांत रघुवंशी