“घमंड ज्यादा हो तो…हस्तीयाँ डूब जाती है” ; संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपची साथ सोडून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली.ही बाब भाजपच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली असून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीत. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सिंधुदुर्गात आले होते. यावेळी त्यांनी कशाप्रकारे शिवसेनेने सत्तेसाठी दगाबाजी केले असल्याचे सांगत हल्लाबोल चढवला होता.यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत हे अनेकदा एखादी कविता किंवा शायरीच्या माध्यमातून विरोधकांना चिमटा काढताना दिसतात. यावेळीही त्यांनी याच खास शैलीत भाजपचे कान टोचले आहेत. “तुफान ज्यादा हो तो,कश्तियाँ डूब जाती है, और घमंड ज्यादा हो तो,हस्तीयाँ डूब जाती है”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, अमित शाह हे रविवारी नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी सिंधुदुर्गमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेनेत बंद दाराआड झालेल्या चर्चेविषयी भाष्य केले.

बंद खोलीत वचन दिल्याचे ते म्हणतात. मात्र मी बंद खोलीत कधीही वचन देत नसतो, तर खुलेआम वचन देत असतो. मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतेही वचन दिलेले नव्हेत, असे म्हणत शाह यांनी सेनेचा दावा फेटाळला. पुढे ते म्हणाले की, शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. जर का आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. त्यावेळी संजय राऊत यांनी पहिले ट्विट करत शाह यांच्या टीकेला उत्तर दिले होते. “सन १९७५ मध्ये रजनी पटेल यांनी आणि ९० दशकात मला वाटते की मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. पुन्हा सन २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असेच म्हटले होते. मात्र दोन्ही वेळेस शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली!”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले होते. तर आजही त्यांनी आपल्या खास शैलीत ट्विट करत भाजपवर पुन्हा निशाणा साधला आहे.

Previous articleराज्यपाल नियुक्त १२ जागांसंदर्भात निर्णय न घेतल्यास सरकार न्यायालयात जाणार !
Next articleसचिन तेंडुलकर,लता मंगेशकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींच्या ट्विट्सची होणार चौकशी