सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींच्या ट्विट्सची होणार चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाविषयी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाने ट्विट केले आणि त्याची एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर रिहानाला उत्तर देण्यासाठी भारतातील सेलिब्रिटींच्या ट्विट्सची एका पाठोपाठ एक मालिका पाहायला मिळली. गेले सत्तर दिवस सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत एक चकार शब्द न काढणारे हे सेलिब्रिटी एकाच सुरात आणि एकाचवेळी कसे काय बोलायला लागले ? असा प्रश्न अनेकांकडून केला जात आहे. तर मोदी सरकारने खेळाडू आणि कलाकारांवर दबाव आणून ट्विट करायला लावल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे या ट्विट्सची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ट्विट्सची चौकशी करणार असल्याचे सांगत तसे आदेशही दिले आहेत. काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग पार पडली. यामध्ये सेलिब्रिटींच्या ट्विट्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर कोणता दबाव टाकण्यात आलेला का? एकाचवेळी त्यांनी ट्विट करण्याचे कारण काय? त्यांचा बोलविता धनी नेमका कोण ? या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आश्चर्यकारक म्हणजे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे ट्विट एकसारखेच आहे. तर सुनील शेट्टी यांनी हितेश जैन या भाजपच्या कार्यकर्त्यालाही ट्विटमध्ये टॅग केल्याचे सचिन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सेलिब्रिटींनी भाजपच्याच दबावाखाली ट्विट्स केल्याची शंका उपस्थित होते.

अनिल देशमुख यांनी या सर्व गंभीर मुद्द्यांची दखल घेतली आहे. त्यानुसार या ट्विट्सची चौकशी होणार आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत ही चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसे होऊ देऊ नका. सर्वांना एकजूट राहण्याचे आवाहन सिलिब्रिटींनी आपल्या ट्विटमधून केले होते.गानसम्राज्ञी लता मंगेशकर,सचिन तेंडुलकर, विराट कोहली,सायना नेहवाल, अक्षय कुमार,अजय देवगण यासंह अनेकांनी असे ट्विट केले होते. ज्यावरून या सिलिब्रिटींना ट्रोलही करण्यात आले होते.

Previous article“घमंड ज्यादा हो तो…हस्तीयाँ डूब जाती है” ; संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा
Next articleसंतापजनक ! कुठे गेला मराठीबाणा ? कुठे गेला महाराष्ट्रधर्म ? भारतरत्नांची चौकशी