संतापजनक ! कुठे गेला मराठीबाणा ? कुठे गेला महाराष्ट्रधर्म ? भारतरत्नांची चौकशी

मुंबई नगरी टीम

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून भारतातील सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विट्सची चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तर भाजपने दबावतंत्र वापरून सेलिब्रिटींनी ट्विट करायला लावले, असा आरोपही विरोधक करत आहेत. यावरून आता राज्यातील भाजप नेते आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर त्यांनी हल्लाबोल चढवला आहे. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या अन्य नेत्यांनीही सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह एक बैठक पार पडली. या बैठकीत सेलिब्रिटींच्या ट्विट्सचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. असे ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर कुणी दबाव आणला होता होता का? याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट्सची चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. यावर राज्यातील भाजप नेते चांगलेच खवळले आहेत. या ट्विटमध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांचा देखील समावेश असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यावर भाजप नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

देवेंद्र फडणवीस –

“संतापजनक! कुठे गेला मराठीबाणा ? कुठे गेला महाराष्ट्रधर्म ? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे”.

चंद्रकांत पाटील –

“महाभकास सरकारने थोडीतरी लाज बाळगावी!
महाभकास आघाडी सरकार कृषी कायद्याच्या बाजूने ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करणार आहे. हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी बोलणाऱ्या लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांचा अपमान आहे. भारतमातेसाठी उभे राहणे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना गुन्हा वाटतो का?”, असा सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आशिष शेलार –

“आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले”, असे ट्विट भाजप नेते आशिष शेलार यांनी केले. पुढे ते म्हणाले की, “कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर.. आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणारआणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!”

राम कदम –

“काँग्रेस नेते आणी महाराष्ट्र सरकारने खालील सिलेब्रिटीजचे ट्वीट काळजीपूर्वक वाचावे. काँग्रेसच्या भाषेत सर्व भाषा सारखी आहे. आता या सर्व सिलेब्रिटीजवर पण कारवाई करणार ? का आमच्या लता दीदी आणी सचिनला त्रास देणार?, असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला आहे.

Previous articleसचिन तेंडुलकर,लता मंगेशकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींच्या ट्विट्सची होणार चौकशी
Next articleभराडीदेवीची यात्रा रद्द ; यात्रेला भाविकांनी न येण्याचे आवाहन