मुंबई नगरी टीम
- काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा होती
- विधानसभा अध्यक्षपदासाठी माझे नाव चर्चेत आले
- जी जबाबदारी देतील ते मी पूर्ण करण्यास तयार
नंदूरबार । काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्याकडे सोपवल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडेच हे अध्यक्षपद राहणार असून त्यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचे नाव चर्चेत आले आहे. याबाबत पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुरुवातीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा होती.त्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो.मात्र तसे काही वातावरण नसल्याचे लक्षात आले. आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपदासाठी माझे नाव चर्चेत आले आहे. राजकारणात अशा चर्चा होतच असतात. मी काँग्रेसशी एकनिष्ठ असून पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ते मी पूर्ण करण्यास तयार असल्याचे के. सी. पाडवी यांनी म्हटले. तसेच आदीवासी विकास खाते पूर्वी राष्ट्रवादीकडे होते, आता ते काँग्रेसकडे आहे. आदिवासी जमातीमध्ये काम करण्याची संधी आहे. त्यामुळे निश्चितपणे पक्ष नेतृत्व त्यासंदर्भात विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत गेल्या आठवड्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाले आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार अशीही चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये ठरल्यानुसार विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

















