मुंबई नगरी टीम
- १ मार्च ते १० मार्च पर्यंत अधिवेशन
- विरोधकांचा सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग
- सरकारला कुठलीही चर्चा करण्यास रस नाही
मुंबई । राज्यातील कोरोनाचा वाढवा प्रादुर्भाव पाहता राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार असून,येत्या ८ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला मात्र या अधिवेशनाचा कालावधी कमी होत असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त करीत या सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चार आठवडे चालणार होते.मात्र राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यासाठी आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन हे १ ते १० मार्च पर्यंत चालणार आहे.त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या राज्यपालांच्या अभिभाषणासह पुरवण्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत.दुस-या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे तर तिस-या आणि चौथ्या दिवशी पुरवण्या मागण्यावर चर्चा होवून त्या मंजूर केल्या जाणार आहेत.अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधी पक्षाचा प्रस्ताव आणि अशासकीय कामकाज होणार आहे.शनिवार आणि रविवारी सुट्टी असून,सोमवारी ८ मार्चला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ९ आणि १० मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा चर्चा होणार आहे.कोरोनामुळे यापूर्वीचे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत गुंडाळण्यात आले होते.पण यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण काळ चालेल अशी शक्यता होती.मात्र फेब्रुवारी महिन्यात राज्यातील कोरोना रूग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालावे त्यानुसार सरकारने कार्यक्रम तयार केला होता.पण राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता हा कालावधी कमी करण्यात आला त्यामुळे सरकार अधिवेशनापासून पळ काढीत आहे हा विरोधकांचा चुकीचा असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी सांगितले.विरोधकांनी मुद्द्यावरून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.हे अधिवेशन एक दिवसाचे घेवून पुढे हे अधिवेशन पूर्ण वेळ घ्यावे अशी मागणी विरोधकांनी केली होती असेही परब यांनी सांगितले.
संजय राठोड,वाढती वीज बिल, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या असे अनेक मुद्द या सरकारला घेरण्यासाठी आहेत मात्र सरकारला कामकाज करायचे नाही म्हणून अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.दरम्यान अधिवेशनाच्या कार्यकाळाबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार विरुद्ध संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली.दादागिरी खपवून घेणार नाही,असा इशाराही विरोधकांनी सरकारला दिला. या खडाजंगीनंतर विरोधकांनी या बैठकीतून सभात्याग केला.यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारला कुठलीही चर्चा करण्यास रस नाही. कोरोनाची भीती दाखवून अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.सरकारच्या पळपुटेपणाचा निषेध करत आम्ही बैठकीतून सभात्याग केला.
येत्या १ मार्चपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनामुळे विशेष काळजी घेतली जाणार असून,सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.सभागृहामध्ये विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी यु.जी.यंत्रणा, ओझोन यंत्रणा, सॅनिटायझेशन कोटींग प्रवेशद्वाराच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग या सारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस सिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सेनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत.तसेच अधिवेशनापूर्वी मंत्री,आमदार,कर्मचारी,अधिकारी आणि पत्रकारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.अधिवेशनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी अभ्यागत तसेच आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही.