संजय राठोडांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण; मंत्रिमंडळ बैठकीत काय झाली चर्चा!

मुंबई नगरी टीम

  • वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्याची घेतली भेट
  • मंत्रिमंडळाची बैठक संपताच राठोड वर्षावर
  • राठोड प्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा नाही

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या भोव-यात असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिमंडळाची बैठक संपताच वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने राठोड यांच्या राजीनाम्यावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्ष भाजपने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर निशाणा साधल्याने गेल्या पंधरा दिवसापासून शासकिय कामकाजापासून दूर असणारे राठोड यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावल्याने अनेक चर्चांना ऊत आला होता.कालच त्यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड यांनी वर्षावर जावून मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीचा तपशील समजला नसला तरी या भेटीमुळे राठोड यांच्या राजीनाम्यावरून अनेक चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

संजय राठोड प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा नाही

संजय राठोड प्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली नाही, अशी माहिती अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली. पोहरादेवीतील गर्दीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत,त्याचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील,असे मलिक यांनी सांगितले.

Previous articleपूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणी सरकार जनतेला माहिती का देत नाही ? प्रविण दरेकरांचा सवाल
Next articleअर्थसंकल्पीय अधिवेशन ८ दिवसच चालणार;कालावधीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी