मुंबई नगरी टीम
- ‘मी निर्णय घेण्यापूर्वी तू निर्णय घे’
- राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
- राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही
मुंबई । पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अडचणीत सापडलेले राज्याचे वनमंत्री यांच्यावर राजीनामा देण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत असून,राठोड प्रकरणी शिवसेना पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे राठोड यांच्यावर नाराज असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनापूर्वी त्यांचा राजीनामा घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.त्यामुळे राठोड आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार की, मुख्यमंत्री राजीनामा घेणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून,अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या हाती वनमंत्री संजय राठोड यांचे आयतेच प्रकरण हाती पडल्याने या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून,त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी चांगलीच लावून धरली आहे.राठोड यांच्या मुद्द्यावरून या अधिवेशनात विरोधक आक्रमक पवित्रा घेणार असल्याने अधिवेशनात राठोड यांच्या मुद्दावर चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणाला अचानक कलाटणी मिळाल्याने शांत झालेले विरोधक राठोड यांच्या प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तर कोरोनाचे नियम पायदळी तुटवून पोहरादेवीत जमाव एकत्र केल्याने मुख्यमंत्री ठाकरे हे राठोड यांच्यावर प्रचंड नाराज असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी याबाबत मोठा निर्णय होण्याची वर्तवली जात आहे.
भाजपच्या सर्वच नेत्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री आणि सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे प्रथम नाव घेणा-या भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याने आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस तपासावरही प्रश्न चिन्ह उभे केले आहे.या प्रकरणी पुरावे असून सुद्धा अद्याप गुन्ह्याची नोंद का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करीत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.पूजाच्या मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर महिला मोर्चातर्फे उद्या शनिवार २७ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी माहिची भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी दिली आहे.पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तींची पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही. पोलीस हाताची घडी,तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत.याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, असेही खापरे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यानंतर वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून स्पष्टीकरण देणारे राठोड यांना या भेटीसाठी प्रतिक्षा करावी लागल्याची चर्चा आहे.तर या प्रकरणाचा सरकारवर काय परिणाम होईल याची चर्चा मुख्यमंत्र्यांनी सरकारमधिल प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी केल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.मुख्यमंत्र्यांच्या भेटीत ‘मी निर्णय घेण्यापूर्वी तू निर्णय घे’, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी संजय राठोड यांना बजावले असल्याची चर्चा आहे.त्यामुळे येत्या सोमवारपासून सुरू होणा-या अधिवेशनापूर्वी वनमंत्री राठोड यांची गच्छंती होणार अशी चर्चा रंगली आहे.राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असा भाजपने इशारा दिला असल्याने राठोड यांच्या राजीनाम्यावरून दबाव वाढतच चालला आहे.त्यामुळे वनमंत्री राठोड अधिवेशनापूर्वी राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे.