मुंबई नगरी टीम
मुंबई । विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी केलेले आरोप खोडत त्यांच्यावर पलटवार केला.मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीससह सुधीर मुनगंटीवार यांनी कोपरखळ्या लगावत अनेक मुद्द्यावर केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.आपल्या आक्रमक भाषणात मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला फटकारत,खोट बोलणं आमच्या रक्तात नाही.मग ती बंद दाराआड झालेली चर्चा का असेना,बाळासाहेबांच्या खोलीत बंद दरवाजाआड पुढच्या वाटचालीची चर्चा केली,तेंव्हा देवेंद्र तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्व ? असा प्रहार त्यांनी फडणवीसांवर केला.
विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.त्यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारवर घणाघात करीत विरोधकांनी केलेले आरोप खोडून काढले.त्यांनी आपल्या भाषणात सुरूवातीलाच केंद्र सरकारमुळेच मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल नसल्याचे सांगितले.मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन.आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले.मराठी भाषा भिकारी आहे का, ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते असेही त्यांनी ठणकावून सांगितले.छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का,केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही,मराठी माती,मराठी माता हे विसरणार नाही असेही त्यांनी सांगितले.सावरकरांना भारतरत्न द्या यासाठी दोन वेळ केंद्राला पत्र दिले असे सांगून,भारतरत्न कोण देऊ शकतो, आमदारांची कमिटी हा देऊ शकते का ? हा अधिकार पंतप्रधान कार्यालयाला असल्याचे सांगून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सीमावादाचा मुद्दा उपस्थित करीत,सीमाप्रश्नी देवेंद्र फडणवीसांना मनापासून धन्यवाद देतो,राजकीय जोडे बाजूला ठेऊन राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते.सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्यावतीने धन्यवाद देतो असे स्पष्ट करून कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कशी सक्ती लादते ते मोडून तोडून काढू असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात औरंगाबादच्या नामांतराचा उल्लेख करताना विरोधकांना टोले लगावले.आता आपला देश प्रत्येक क्रिकेट मॅच जिंकणार कारण स्टेडियमचे नाव बदलले,वल्लभभाईचे नाव पुसून टाकून दुस-यांचे नाव देता मात्र आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर करूच असा दावा केला. संभाजीनगरच्या विमानतळाचे छत्रपतीचे नावही केद्राने अडवून ठेवल्याचे त्यांनी सांगून,आम्हाला हिंदुत्व शिकवता ? असा सवाल विरोधकांना केला.
मुख्यमंत्र्यांनी राम मंदिरावरूनही विरोधकांना सुनावले.राममंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे असा आग्रह धरत असल्याची टीका करीत काश्मिर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेंव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगून आमचे हिंदुत्व काढत असतांना काश्मिरमध्ये फुटीरतावादांबरोबर सत्ता स्थापन केली तेंव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व असा घणाघात त्यांनी केला.हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका,तुम्ही त्याला पात्र नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.२०१४ ला युती तुम्ही तोडली, तेंव्हाही आम्ही हिंदु होतो, आज ही आहोत,उद्या ही राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या काळात राज्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला.काय करावे काय करू नये हे सांगितले.त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असेही ते म्हणाले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आल्याने सरकार खबरदारी घेत आहे.देशात जगात पहिले जम्बो हॉस्पीटल आपण उभे केले. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडे आहे.आपण महाराष्ट्रातील रूग्ण संख्या लपवली नाही असे सांगतानाच,मार्चमध्ये प्रादुर्भाव सुरु झाला,हॉस्पीटल,बेड नव्हते,रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येऊपर्यंत मृत्यू व्हायचा याची पारदर्शीपणे माहिती दिली.त्यांना बीपी, हार्टचे आजार होते. आणि नंतर त्यांना करोना झाल्याचे ही दिसून आले.त्यामुळे खोट बोलणं आमच्या रक्तात नाही.पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन केला.मी त्यांना फोन केला. लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न करा, मजुरांना जाण्यासाठी ट्रेन द्या पण तेंव्हा त्यांनी काही नाही केले.लॉकडाऊन केल्यानंतर लोक लाखो लोक त्यांच्या राज्यात जात असतांना तांडेच्या तांडे पायी गेले.या लोकांना राज्य सरकारने मोफत अन्नधान्य दिले,त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली. आपापल्या राज्यात गेल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांनी इथे उगीच आलो, महाराष्ट्राने यापेक्षा आमची काळजी घेतली,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आमच्याकडे कोविडचा हिशोब विचारता,जरुर विचारा पण महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी उपायोजना कराव्या लागतात तेंव्हा आपला फंड महाराष्ट्राला न देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता दिल्लीला दिला असा जाब त्यांनी भाजपला विचारत,पीएम केअर फंडचा हिशोब कोण देणार असा सवाल त्यांनी केला.मला व्हिलन ठरवले तरी चालेल,वाईट म्हटले चालले तरी मला पर्वा नाही. मी माझ्या राज्याशी बांधील असून, त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे. काही चुकीचे होत असेल तर नक्की कारवाई करू,थट्टा कुणाची करता, माझे कुटुंब माझी जबाबदारीची थट्टा करताय, करा,पण सामान्यांच्या जीवाशी खेळू नका असेही त्यांनी विरोधकांना बजावले.जे शेतकरी तिकडे आंदोलनासाठी बसले त्यांची वीज कापली जाते,त्यांची शौचालये तोडली जात आहेत,पाणी तोडले जात आहे, एवढेच नाही तर सार्वभौम देशाच्या राजधानीत ते येऊ नये म्हणून मार्गावर खिळे ठोकले जात आहेत.शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे ही भूमिका बदलून या सीमेवर खिळे ठोकले असते तर तो देशात घुसला नसता अशी घणाघती टीका त्यांनी केली.शेतकरी देशद्रोही आहे का, देश ही तुमची खाजगी मालमत्ता नाही.शेतकऱ्यांना ताटकळत ठेवत असाल, त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असाल तर देश तुमची खाजगी मालमत्ता नाही, आणि महाराष्ट्र तर नाहीच नाही असे सांगून,विदर्भ माझं आजोळ आहे, ते माझ्यापासून तोडण्याचा विचार सोडा. विदर्भाला वेगळे होऊ देणार नाही. ते आम्ही होऊ देणार नाही असे वेगळा विदर्भाची मागणी करणा-यांना मुख्यमंत्री ठणकावले.