महिलांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील;भाजपच्या नेत्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची केली मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । जळगाव मधील महिला वसतीगृहात मुलींना नग्न नाचवल्या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या उत्तरामुळे सत्ताधारी आणि भाजपमध्ये घमासान बघायला मिळाले.गृहमंत्र्यांच्या उत्तरावर भाजपचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार आक्षेप घेत,महिलांच्या बाबतीत हे सरकार असंवेदनशील आहे.मग कशाला सरकार पाहिजे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला.

जळगाव मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा मुद्दा भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित केला असता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची नोंद घेतली असे उत्तर यावर दिल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले काही वेळ या प्रकरणी सभागृहात गोंधळ झाला.या प्रकरणी तपास सुरू असून,संपूर्ण चौकशी झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी सभागृहात सांगितले.गृहमंत्र्यांच्या उत्तराला आक्षेप घेत भाजपचे सदस्य मुनगंटीवार यांनी गृहमंत्री आणि सरकारवर निशाणा साधला.या प्रकरणाची काही तासात चौकशी करतो,कारवाई करू,असे गृहमंत्री देशमुख यांनी घोषणा करायला पाहिजे होती.पण महिलांच्या बाबतीत हे सरकार असंवेदनशील आहे. मग कशाला सरकार पाहिजे.राज्यात तर राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे,अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.एकच मागणी राज्यात राष्ट्रपती राजवट असेही मुनगंटीवार म्हणाले.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रपती राजवटीची धमकी देणे योग्य नसल्याचे सांगत सध्या राजकीय हेतूने काम चालू असल्याचे सांगितले.राष्ट्रपती राजवट केंद्र सरकार करु शकते.पण विधिमंडळाचा वापर करुन अशी मागणी योग्य नाही ते वाक्य काढून टाकावे,अशी मागणी मलिक यांनी केली.त्यानंतर उपाध्यक्षांनी याची दखल घेत मुनगंटीवार यांचे वाक्य कामकाजातून काढून टाकले.तर अशी मागणी करण्याचा अधिकार आहे.या प्रकरणात व्हिडीओ क्लिप असून,ही घटना गंभीर असल्याने कडक कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले.अखेर या प्रकरणावरून चार अधिकाऱ्यांची समिती नेमण्याची घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी करून याचा दोन दिवसात अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

Previous articleविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी “या” आमदारावर कारवाईची केली मागणी
Next articleमुख्यमंत्री विधानसभेत गरजले ! हिंदुत्वावरून भाजपला सुनावले खडेबोल