मुंबई नगरी टीम
सिंधुदुर्ग । कोरोनाच्या संकटात परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना देशात आणण्यासाठी पुढाकार घेतलेले आणि संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे अशी ओळख असलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अडचणीत सापडलेल्या पुण्यातील एका कुटूंबाला मोठा आधार दिल्याची घटना नुकतीच घडली आहे.
गेल्या आठवड्यात पुण्यातील सहा तरूण गोव्याला सहलीसाठी गेले होते.तीन ते चार दिवस हे युवक गोव्यात भटकंती करीत होते. त्यातील नयन घुगले या तरूणाला परवापासून म्हणजे गुरूवारपासून पाठीचा आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.गॅसेसचा त्रास असावा म्हणून त्याने यावरील औषध घेतले.त्रास कमी न होता अधिक होवू लागल्याने या सहा मित्रांनी पुन्हा पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार या सहा मित्रांनी पुण्याला जाणा-या सायंकाळच्या आराम बसने प्रवास सुरू केला.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळपास पोहचताच नयन घुगले या तरूणाला अस्वस्थ वाटू लागले.त्याच्या छातीत दुखू लागल्याने मित्रांनी झाराप येथे बस थांबवण्याची विनंती बस चालकाला केली.त्यानंतर या तरूणाला सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले मात्र रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.या सर्व प्रकारामुळे त्याच्या सोबतच्या तरूणांना मोठा धक्का बसला.आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याने हे सर्व तरूण प्रचंड तणावाखाली होते.मध्यरात्र असल्याने या संकटाला कसे सामोरे जायचे या विचारात हे सर्व जण होते.
सोबत असलेल्या मित्रांनी यांची माहिती या तरूणाच्या कुटूंबाला आणि नातेवाईकांना फोन करून दिली.सावंतवाडीत ही घटना घडल्याने पुण्यात असलेले नातेवाईक मदतीसाठी एकमेकांना फोन करीत होते.मात्र कुठूनही मदत मिळत नसल्याने त्यांनी आपल्या पुण्यातील एका मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली.योगायोगाने त्यांचे हे मित्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या परिचयाचे निघाले.सामंत हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असल्याने ते मदत करतील असे सांगितल्यावर संबंधित कुटूंबाला थोडासा धीर मिळाला.काल शुक्रवारपर्यंत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मंत्री सामंत हे मुंबईत होते.मध्यरात्र असतानाही पुण्यातील संबंधित व्यक्तीने मंत्री सामंत यांना फोन केला आणि घडलेली घटना सांगितली.मंत्री सामंत यांना संपूर्ण माहिती मिळताच संबंधित तरूणांच्या मदतीसाठी सामंत यांनी आपल्या दोन स्वीय सहाय्यकांना सावंतवाडीला पाठवले.शाहू गुजर व सुरज देसाई या दोन स्वीय सहाय्यकांनी मध्यरात्री सावंतवाडीत जावून,कायदेशीर प्रकिया पूर्ण करीत, मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास रूग्ण वाहिकेने पुण्याला रवाना केला तर या तरूणासोबत असलेल्या मित्रांना एका कारने पुण्याकडे रवाना केले.मध्यरात्री घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे या तरूणांना आणि मृत्यू पावलेल्या तरूणाच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागले असते मात्र लोकप्रतिनिधीच्या नात्याने मंत्री उदय सामंत यांनी संवंधित कुटूंबाला धीर दिल्याने आणि अडचणीत मदतीचा हात दिल्याने या कुटूंबाला अनेक अडचणीवर मात करता आली.