देशासाठी त्याग व बलिदान केलेल्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून छळ

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने विरोधकांना संपवण्याचे राजकारण सुरु केले असून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून दडपशाही केली जात आहे. काँग्रेस पक्ष,सोनिया गांधी,राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारला धारेवर धरत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे षडयंत्र आहे.गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग केला आहे व बलिदान दिले आहे, त्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे त्याविरोधात काँग्रेस आवाज उठवत राहील,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी केली जात असल्याने केंद्र सरकारच्या या सुडबुद्धीच्या कारवाईविरोधात मुंबईत मंत्रालयामोर सत्याग्रह करण्यात आला, त्यावेळी पटोले बोलत होते.यावेळी पटोले यांच्यासह,विधिमंडळ काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंह सप्रा, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पटोले म्हणाले की, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या गुलाम बनल्या आहेत. सरकारच्या इशाऱ्यावर या संस्था विरोधकांवर कारवाई करत आहेत. परंतु काँग्रेस अशा कारवायांना घाबरत नाही.महागाई,जीएसटी, अग्निपथ सारख्या सरकारच्या चुकीच्या धोरणांवर काँग्रेस पक्ष सरकारला जाब विचारत आहे. सरकारकडे या प्रश्नावर उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी चौकशीचा फार्स केला जात आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्राने स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे, त्याच वर्तमान पत्राच्या खोट्या प्रकरणात सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली जात आहे म्हणून राज्यभर जिल्हा, तालुका प्रदेश पातळीवर काँग्रेसचा सत्याग्रह करून केंद्र सरकारचा निषेध केला आहे.यावेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सोनिया गांधी त्याग आणि संघर्षाच्या प्रतिमूर्ती आहेत. त्या देशातील गोरगरीब, सर्वसामान्य पीडित शोषीत वंचितांचा आवाज आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला त्या भीक घालत नाहीत. आमच्यासारखे कोट्यवधी कार्यकर्ते त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी सारखे सामान्य माणसांचे प्रश्न हाताळत आहे. संसदेत व संसदेबाहेर काँग्रेस पक्ष भाजपा सरकारला जाब विचारत आहे त्यामुळे ईडीसारख्या कारवायांच्या माध्यमातून दबाव आणून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे. लोकशाहीत विरोधकांना असा त्रास देण्याचे काम लोकशाहीला मारक आहे. सरकारविरोधात आवाज उठवणे हा लोकशाही परंपरेचा भाग आहे पण भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे.मुंबईत शांततापूर्ण सत्याग्रह करत असताना पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सोडून दिले. तर दिल्लीत खा. राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदार, नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन सत्याग्रह मोडण्याचा प्रयत्न केला.पुण्यात प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मा. आ. उल्हास पवार मा. मंत्री रमेश बागवे, अरविंद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. तर नागपूरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सोशल मीडियाचे विशाल मुत्तेमवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यातील इतर शहरातही सत्याग्रह करण्यात आला.

Previous articleउदय सामंतांच्या प्रयत्नांना यश,रत्नागिरीकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार
Next articleबाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई शिंदे गटात ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट