उदय सामंतांच्या प्रयत्नांना यश,रत्नागिरीकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून,लवकरच रत्नागिरीकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून यासाठीचा सुधारीत प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री असताना त्यांनी रत्नागिरी हे एज्यूकेशन हब व्हावे यासाठी प्रयत्नशील होते.शिवाय त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मोठे प्रकल्पही आणले आहेत.रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.अखेर माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश आले असून,त्यांच्या या प्रयत्नांमुळे रत्नागिरीकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला माजी मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत,मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

राज्यभरातील वैद्यकीय सेवा सुविधांचे जाळे यांचे विस्तारीकरण करीत असताना रत्नागिरी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे.त्यामुळेच प्राधान्याने या महाविद्यालय उभारणीबाबतचा सुधारीत प्रस्ताव सादर करावा. याबरोबरच या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरु करता येईल का, सुरु करायचे झाल्यास काय तयारी करणे आवश्यक आहे याची तयारी करण्यात यावी.भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबतची तयारी करावी. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करील.रत्नागिरी जिल्हयात शासकीय रुग्णालय, महिलांचे रुग्णालय आणि मनोरुग्णालय एकत्र असलेल्या परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय उभारताना या जागेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून वित्त व नियोजन,महसूल आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अभिप्रायही घेण्यात यावेत अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Previous articleकाही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले
Next articleदेशासाठी त्याग व बलिदान केलेल्या गांधी कुटुंबाचा मोदी सरकारकडून छळ