मुंबई नगरी टीम
मुंबई । “जास्तीत जास्त तीन महिने,नंतर देवेद्र फडणवीस तुम्हाला तुमची दीड वर्षांपूर्वीची चूक सुधारायची आहे !” अशा थेट शब्दात माजी वित्तमंत्री व भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे संकेत थेट विधानसभेत दिले.हे सरकार सत्तेवर आले ही देवन्द्रजी तुमचीच चूक आहे असे सुनावत,आता काहीही करा, हवी तेव्हढी ताकद लावा आणि पुन्हा सरकार मिळवा असेही मुनगंटीवार म्हणाले.अंदाजपत्रकावरील चर्चेवेळी ते बोलत होते.
“हे ठाकरे सरकार आहे की ठार मारे सरकार आहे ?” अशा शब्दात मनसुख हिरेन प्रकरणावर भाष्य करत सचिन वाझेंना सरकार का पाठीशी घालते आहे ? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. फडणवीस यांच्या काळात सुरु झालेल्या मेट्रो, मोनो व विविध रस्ते प्रकल्पांचाच उल्लेख अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केल्याची टीका करताना मुनगंटीवार म्हणाले की आम्ही सत्ता सोडली तेंव्हा राज्यावर चार लाख कोटी रुपयांचे कर्ज होते व त्याचे सकल उत्पन्नाशी प्रमाण सोळा टक्के, इतके होते. काँग्रेसकडून आम्ही राज्य घेतले तेंव्हा हेच प्रमाण सतरा टक्के होते.म्हणजेच आमच्या कालावधीत कर्जाचे प्रमाण कमी झाले होते.अजित पवारांनी गेल्या दीड वर्षात दोन लाख कोटींचे जादा तर कर्ज केलेच,पण त्याचे उत्पन्नाशी असणारे प्रमाण थेट वीस टक्क्यांवर गेले आहे अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
विदर्भातील अनिल देशमुख सुनील केदार व विजय वडेट्टीवार या मंत्र्यांना ठाकरे सरकारमध्ये चांगली खाती मिळालेली नाहीत अशी टीका मुनगंटीवारांनी केली तेंव्हा अनिल देशमुखांनी त्यात हस्तक्षेप करत मुनगंटीवरांना म्हटले की, गेल्या पाच वर्षात तुमचा क्लेम असूनही तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, ते देवेंद्र फडणवीसांना मिळाले,याचे दुःख लपवतच तुम्ही फिरत होतात! इतना क्या मुस्कुरात हो, क्या गम छिपा रहे हो असे आम्ही म्हणत होतो, असा चिमटा देशमुखांनी काढला, तेंव्हा मुनगंटीवार यांनीही एक शेर पेश करत तुमची मुदत फक्त तीन महिने आहे असे सराकरला बजावले. ते म्हणाले की “कुछ देरकी खामोशी है फिर शेर आएगा सिर्फ तीन महिनेकी देरी है, फिर हमारा दौर आएगा!” पुन्हा एकदा मुनगंटीवारांनी फडणवीसांनाच सुनावले की हे सरकार सत्तेवर आले ही देवन्द्रजी तुमचीच चूक आहे. आता काहीही करा,हवी तेव्हढी ताकद लावा आणि पुन्हा सरकार मिळवा असेही मुनगंटीवार म्हणाले. आम्हालाच जनमताचा कौल होता पण हे सरकार बेईमानीने सत्तेत आले आहे.अशी टीकाही त्यांनी केली.