मुंबई नगरी टीम
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ वाहनाच्या प्रकरणामुळे सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात उलथापालत होणार असल्याची चर्चा होती.मात्र अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय आजच्या बैठकीत नव्हता,त्यामुळे अशा वावड्या उठवण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभी करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि या प्रकरणात सचिन वाझे यांचा असलेल्या सहभागावरून वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.या प्रकरणी विरोधकांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर आरोपांचा भडीमार केला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून विविध मुद्द्यावर चर्चा केली.त्यानंतर राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या मंत्र्यांची आढावा बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली.या बैठकीमुळे सरकारची बदनामी आणि नाचक्की टाळण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.ही बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही बैठक पूर्व नियोजित असल्याचे सांगितले.या बैठकीत अनिल देशमुख यांच्यासंदर्भात कसलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून चांगला कारभार करत आहेत.त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा कोणताही विषय पक्षासमोर नाही,तसा प्रश्नच नाही. त्यामुळे यावरून वावड्या उठवण्याची गरज नाही, असे पाटील यांनी सांगून,मंत्रिमंडळात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. आजच्या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नसून,या प्रकरणात दोषी आढळणा-यावर कठोर कारवाई केली जाईल असेही पाटील म्हणाले.वाझे प्रकरणात कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न कोणाकडूनही होत नाही असेही त्यांनी सांगितले.