अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये फेसबुक लाईव्ह मिटिंग कुणी ठरवली होती ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची झालेली हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे.मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी असून, ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे.या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार, हा वाद होता. यामधून हा प्रकार घडला असल्याचे सांगून,अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात समझोता घडवून फेसबुक लाईव्ह मीटिंग कुणी ठरवली होती, कुणाच्या सांगण्यावरून ठरवली, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरान्हो यांनी चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकार हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करून त्याला प्रत्युत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले.गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाकडून गुन्हेगारीच्या घटनांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला वारंवार लक्ष्य केले जात आहे.या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी मॉरिस नोरान्हो हा कशाप्रकारे उद्धव ठाकरे गटाशीच संबंध होता, हे सविस्तरपणे सांगितले. त्यासाठी सामंत यांनी ‘सामना’ दैनिकातील कात्रणे सादर केली. या माध्यमातून सामंत यांनी घोसाळकर यांची हत्या ठाकरे गटातील अंतर्गत वादातूनच घडल्याचे ठळकपणे अधोरेखित केले.

अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्होचे उदात्तीकरण ठाकरे यांच्या पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ मधून करण्यात आले आहे. ‘सामना’तून वेळोवेळी मॉरिस नोरान्होच्या सामाजिक कार्याचा गौरव आणि त्याला पाठिंबा दिला जात होता. मॉरिसच्या कामाला ‘सामना’तून तर घोसाळकर कुटुंबीयांच्या कामाला मातोश्रीवरुन पाठिंबा दिला जात होता. राज्यात कुठलीही घटना घडली की त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्र्यांना यांना जबाबदार धरणे चूक आहे. आरोप प्रत्यारोप होतात हे मी समजू शकतो, त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो. पण आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचे व त्यांना बदनाम करायचे ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे त्याला छेद देण्याची गरज आहे असेही सामंत म्हणाले.मी कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कुणाला आदर्श मानतो आणि मी कुणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे अशी ट्विट्स देखील मॉरिसने समाज माध्यमांवर टाकलेली आहेत. म्हणुन अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस नोरान्हो आणि अभिषेक घोसाळकर यांना आपापसात समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण,याचा शोध घेतला पाहिजे.या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते ? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी उबाठामध्ये एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सामंत यांनी केली.

Previous articleफडणवीस सत्तेचे लालची…पटोले लाचार,हतबल आणि निष्क्रीय ! भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
Next articleमहायुती सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा