मुंबई नगरी टीम
बीड । राज्यात एकीकडे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच दुसरीकडे रेमडेसिवर आणि कोरोना लसींचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली असतानाच बीड जिल्ह्यातील कोरोना लसींच्या तुटवड्यावरून माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या दोघांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.
माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील रेमडेसिवर आणि कोरोना लसीचा तुटवड्याबाबत ट्विट करीत सरकारने बीडला दिले केवळ २० डोस ; पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं असा प्रश्न उपस्थित करून याचा पुरावा पोस्ट केला.यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे.बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहित आहे,जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असेही त्यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत सामाजिक न्यायमंत्री बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी, ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा,जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असा टोला लगावला आहे.
राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ! pic.twitter.com/H6dgMPaFFL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2021
राज्याच्या भल्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीन.त्याची दखलही घेतली जाईल.पण तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा,”तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी,अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी करीत धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या २ लाख डोसेस पैकी बीडला इतर जिल्हयाच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं ? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभिर्याने लक्ष घालून पुरेसे डोसेस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको.अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल.असे ट्विट करीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या आरोपला उत्तर दिले आहे.बीड मधील कोरोना लसींचा तुटवड्यावरून सुरू असणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सुरू असणारे ट्विटर वॅार दिवसभर चर्चेचा विषय ठरला आहे.