एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पासची गरज आहे का ? डिजींचा खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या लॉकडाऊनच्या काळात एका जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची सक्ती करण्यात आली होती.योग्य कारणाशिवाय आणि ई-पास असल्याशिवाय त्यावेळी प्रवास करता येत नव्हता. मात्र सध्या राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज आहे किंवा नाही याचा खुलासा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केला आहे.

राज्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.त्यासंदर्भात सरकारने नियमावली जाहीर केली आहे.गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत पोलिसांच्या ई-पासशिवाय राज्यांतर्गत,राज्याबाहेरील प्रवास करता येत नव्हता.मात्र या लॉकडाऊन प्रवासासाठी ई-पास पद्धत लागू न करण्याबाबत विनंती करण्यात आली होती.ही विनंती सरकारने मान्य केल्याने एका जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता नसल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले आहे. मात्र प्रवास करण्याचे वैध कारण प्रवाशांकडे असायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय अत्यावश्यक सेवांशी संबंधित व्यक्ती आणि अत्यावश्यक कामांसाठी नागरिक प्रवास करू शकणार आहेत.असा प्रवास करताना तपासणीही करण्यात येणार असल्याचे सांगतानाच,विनाकारण प्रवास करणाऱ्या किंवा घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कालपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी राज्य पोलीस दलातील दोन लाख पोलीस मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत.गृहरक्षक दलाचे १३ हजार जवान, राज्य राखीव दलाच्या २२ तुकड्यांची अतिरिक्त कु मक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleअन्यथा आम्ही लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाटू : प्रविण दरेकरांचा इशारा
Next articleलसीच्या तुटवड्यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेमध्ये जुंपली